esakal | लोहा : आखाड्यास आग लागून आठ शेळ्या ठार तर बैल भाजले; जवळपास दहा लाखाचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

लोहा तालुक्यातील हरणवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी नामदेव नारायण नकीतवाड यांच्या शेतात गट क्रमांक 106 मधील आखाड्याला ता. 11 डिसेंबर 2020 रोजी आग लागली.आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे आगीच्या भक्षस्थानी सात शेळ्या आल्या त्यांचा पूर्णतः कोळसा झाला.

लोहा : आखाड्यास आग लागून आठ शेळ्या ठार तर बैल भाजले; जवळपास दहा लाखाचे नुकसान

sakal_logo
By
बा. पु. गायखर

लोहा (जिल्हा नांदेड) : लोहा तालुक्यातील हरणवाडी येथे एका अल्पभुधारक शेतकऱ्याच्या आखाड्याला अचानक आग लागून सात शेळ्यासह, बैल, 60 क्विंटल कापूस व सोयाबीनचा अक्षरशः कोळसा झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ११) डिसेंबर रोजी घडली. 

लोहा तालुक्यातील हरणवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी नामदेव नारायण नकीतवाड यांच्या शेतात गट क्रमांक 106 मधील आखाड्याला ता. 11 डिसेंबर 2020 रोजी आग लागली.आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे आगीच्या भक्षस्थानी सात शेळ्या आल्या त्यांचा पूर्णतः कोळसा झाला. आखाड्यावरील 60 क्विंटल कापसाची राख झाली. 20 क्विंटल सोयाबीनचे नुकसान झाले. 10 क्विंटल ज्वारीचे नुकसान झाले आहे. आगीमुळे शेतकऱ्याचा बैल गंभीररित्या भाजला असून एक गोरा देखील आगीने पूर्णतः जखमी झाला आहे. गव्हाचे पाच क्विंटलचे नुकसान झाले आहे.  मूग, डाळ व इतर कडधान्याची जवळपास एक क्विंटलची राखरांगोळी झाली. 

हेही वाचा नांदेड : ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्याचा ‘फेस्कॉम’चा संकल्प -

जीवनभर कमविलेले आगीने एका झटक्यात नेले सदरील शेतकरी हे अल्पभूधारक असल्यामुळे ते ऊस तोडण्यासाठी बाहेरगावी गेले होते. त्यांची पत्नी व मुली मात्र आखाड्यावरील कामे उरकून घराकडे गेल्या होत्या. आग लागल्याचे त्यांना विलंबाने समजले. आगीचे लोट पाहून गावकरी आखाड्याकडे धावले जमेल त्या पद्धतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. जवळपास तीन तासानंतर सदरील आग आटोक्यात आली. मात्र या तीन तासांनी होत्याचे नव्हते झाले. सर्व आखाड्यावर राखेचा ढीग पडला होता. शेळ्या, जनावरांचे भाजून निघालेले मृतदेह नजरेस पडत होते. सर्व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. आग प्रचंड वाढल्याने ती विजवण्यासाठी पळापळ, धावाधाव आणि रडण्या, ओरडण्याचा आवाज सर्वत्र कानी पडत होता, एकंदरीत हृदयद्रावक असे चित्र पाहून अनेकांचे डोळे पाणावत होते. सदरील आग विजेच्या शॉर्टसर्किटमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

एका अल्पभूधारक शेतकऱ्याचे जवळपास दहा लाखाच्यावर नुकसान झाल्याने त्यांच्या संसाराची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे. शासनस्तरावरून त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करावी आणि  उद्ध्वस्त झालेला संसार पूर्ववत सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत. घटनास्थळास महावितरणचे श्री. राठोड, माळाकोळी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्री. कलेवाड , पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. हाके, प्रहार जनशक्ती पक्ष्याचे लोहा तालुकाध्यक्ष माऊली गित्ते, तलाठी आनेराव आदीनी भेट दिली.

loading image