नांदेड : ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्याचा ‘फेस्कॉम’चा संकल्प

प्रमोद चौधरी
Saturday, 12 December 2020

महाराष्ट्रात पाच हजार नऊशे ज्येष्ठ नागरिक संघटना असून सुमारे दहा लाख ज्येष्ठ नागरिक ‘फेस्कॉम’सोबत जोडलेले असल्याचेही श्री. बाऱ्हाळे यांनी सांगितले.

नांदेड : बदलत्या जीवनशैलीमध्ये ज्येष्ठांच्या समस्या गुंतागुंतीच्या झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांना उतरत्या वयामध्ये असंख्य यातना सहन कराव्या लागत असून, त्यांना एकत्रित आणून त्यांच्या मागण्या आणि समस्या सोडविण्याचा संकल्प ‘फेस्कॉम’चा आहे, असे मत वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बाऱ्हाळे यांनी व्यक्त केले. 

‘फेस्कॉम’ संघटनेच्या स्थापना दिन शनिवारी (ता.१२ डिसेंबर) साजरा होत आहे. त्यानिमित्त त्यांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, ज्येष्ठांचे कल्याण, सुरक्षितता, संपत्तीचे रक्षण या मुख्य उद्देशासोबतच भारतातील ज्येष्ठांचे मनोरंजन व्हावे यासाठी ‘फेस्कॉम’चा प्रयत्न आहे. ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘फेस्कॉम’ महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, विदर्भ (पूर्व), विदर्भ (पश्चिम), कोल्हापूर - सांगली, खानदेश, मराठवाडा दक्षिण, मराठवाडा उत्तर, चंद्रपूर अशा अकरा विभागातून प्रयत्न करत आहेत. 

हेही वाचा - नांदेडला शुक्रवारी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू; ४३ पॉझिटिव्ह तर ४७ कोरोनामुक्त

श्री. बाऱ्हाळे यांनी सांगितले की, परिस्थिती नेहमी बदलत असते. त्याला कसे सामोरे जायचे? हे ठरवायचे असते. आज मुलांच्या जन्मदरापेक्षा ज्येष्ठ होण्याचा दर जास्त आहे. त्यामुळे जग आता लवकरच ज्येष्ठांचा देश होणार असून, त्यावेळी कोणती संकटे उभी राहतील? हे आत्ताच सांगता येणार नाहीत. आपण लोकशाही स्वीकारली आहे. सर्व काही शासनाने करावे असे नाही. शासनाच्या अनेक योजना लोकसहकार्याशिवाय निरर्थक झाल्या आहेत. त्यामुळे लोकशाहीत सामाजिक बांधिलकी महत्त्वाची ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. 

येथे क्लिक कराच - नांदेड : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे

गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघटना
गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघटना ही संकल्पना राबविण्याचा संकल्प ‘फेस्कॉम’ने केला आहे. शहरात, तालुक्यात आणि गावात ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुषांनी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सभासद होवून संघटनेची शक्ती वाढवावी. महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक महिला संघटीत असून पाचशेहून अधिक महिला संघ आज कार्यरत झाले आहेत. एकंदरीतच एकमेकांच्या समस्या सोडविण्याचा ‘फेस्कॉम’चा प्रयत्न केला जात आहे. 
- सुभाष बाऱ्हाळे, संस्थापक अध्यक्ष, वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघटना, नांदेड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fescoms Resolve To Solve The Problems Of Senior Citizens Nanded News