नांदेडमध्ये दोन घरफोडीत पाच लाखांचा ऐवज लंपास 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

अर्धापूर येथील दुकान फोडून साडेतीन लाखाचे खत व औषध लंपास. तर नांदेड शहराच्या देगलूर नाका परिसरातील मदिनानगर येथे दीड लाखाची घरफोडी. 

नांदेड : अर्धापूर येथील एक खताचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी साडेतीन लाखाचे औषधी व रासायनीक खताचा माल लंपास केला. ही घटना तामसा रस्त्यावर शनिवारी (ता. १३) रात्री घडली. 

अर्धापूर शहराच्या तामसा रस्त्यावर प्रकाश सटवाजी बारसे यांचे शिवप्रकाश ॲग्रो ट्रेडर्स नावाची रासायनीक खते व बी- बियाणांची दुकान आहे. त्यांनी शुक्रवारी (ता. १२) रात्री आपले दुकान नेहमीप्रमाणे बंद करुन घरी निघून गेले. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर तोडून दुकानातील तिन लाख ५५ हजार ८०० रुपयाचे औषध व खताचा माल लंपास केला. ही बाब शनिवारी (ता. १३) सकाळी दुकान उघडण्यासाठी श्री. बारसे गेले असता चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. 

अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

त्यांनी दुकानात जावून पाहिले तर दुकानातील औषध व खत चोरीला गेल्याचे दिसले. त्यांनी लगेच अर्धापूर पोलिस ठाणे गाठले. दुकान फोडल्याची माहिती श्री. बारसे यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून प्रकाश बारसे यांच्या फिर्यादीवरुन अर्धापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. सुरवसे करत आहेत. 

हेही वाचा -  कोरोना योद्ध्यांसाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा पुढाकार

घरफोडीत दीड लाखाचा ऐवज लंपास 

नांदेड : उघड्या दारातून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून पलंगावरील एक लाख ४० हजाराचे सोन्याचे दागिणे लंपास केले. ही घरफोडी मदिनानगर, देगलूर नाका परिसरात शुक्रवारी (ता. १२) घडली. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, देगलूर नाका परिसरातील मदिनानगर येथे राहणारे मोहमद रियाज मोहमद आबास (वय ३६) हे शक्रवारी आपल्या घराचे दार समोर करुन श्रीनगर येथील औषधी दुकान उघडण्यासाठी गेले. मात्र तिकडे अज्ञात चोरट्यांनी उघड्या दारातून सरळ त्यांच्या बेडरुममध्ये प्रवेश करून पलंगावर ठेवलेले एक लाख ४० हजाराचे सोन्याचे दागिणे लंपास केले. मोहमद रियाज यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अरूण नागरे करत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: looted Rs 5 lakh in two burglaries nanded crime news