माहूरमध्ये दहापैकी सात ठिकाणी प्रस्थापितांना धक्का; वाई बाजार गटात शिवसेनेचे पानिपत

साजीद खान
Monday, 18 January 2021

 
सेलू,असोलीसह वीस वर्षापासून ताब्यात असलेल्या सिंदखेडमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व

माहूर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील दहा ग्रामपंचायतसाठी १५ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत परिवर्तन केले असून हडसणी, आष्टा, असनमाळ अपवाद वगळता सात ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे. प्रामुख्याने सिंदखेड, असोली व सेलू ही गावे शिवसेनेचा बालेकिल्ला असे राजकीय समीकरण गेली अनेक वर्ष होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र या बालेकिल्ल्यातच शिवसैनिक गारद झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योतिबा खराटे यांच्या प्रभावाखाली पुरस्कृत पॅनलद्वारे लढणाऱ्या शिवसेनेला या तिन्ही गावातील अधिकांश जागांवर यश मिळेल,अशी अपेक्षा होती. मात्र, शिवसेनेच्या गटातील उमेदवारांना पिछाडीवर टाकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव पुरस्कृत उमेदवारांनी अधिक जागा काबीज केल्याने ग्राम पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. तर पापलवाडी येथे राष्ट्रवादीविरुद्ध काँग्रेस अशा सामन्यात काँग्रेस पुरस्कृत पॅनलने मुसंडी मारली आहे.

हडसणी येथे प्रस्थापित हडसणी विकास पॅनलला नऊपैकी सात जागांवर समाधान मानावे लागले. त्यात एका जागेवर समसमान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठी नुसार उमेदवाराची निवड करण्यात आली. यात विनोद पाटील शिंदे यांच्या पॅनलच्या उमेदवाराची चिठ्ठी निघाल्याने प्रस्थापित पॅनलचे एकूण नऊ पैकी आठ उमेदवार निवडून आले तर. लिंबायत, मेट, हरडफ, असोली, सेलु, पापलवाडी व सिंदखेड येथे मतदारांनी प्रस्थापित पॅनला नाकारून नवीन चेहऱ्याला संधी दिली. सिंदखेड येथे शिवसेना पुरस्कृत शेकन्ना गुंडावार यांच्या वीस वर्षांपासून असलेल्या एक हाती सत्तेची घोडदौड थांबून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत मोहन लागेलवार यांच्या पॅनेलला सातपैकी सहा जागा मिळाल्या. शिवाय सिंदखेड येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या काही दिवसाआधी शिवसेना सभासद नोंदणीच्या निमित्ताने खासदार हेमंत पाटील यांनी सभा देखील झाली होती हे विशेष. 

हेही वाचा -  नांदेडमध्ये थरार : शिवाजीनगरच्या व्यापाऱ्यावर वजिराबादमध्ये प्राणघातक हल्ला

तसेच सेलूमध्ये शिवसेना पुरस्कृत पॅनलला हदरा देत राष्ट्रवादी पुरस्कृत अतिश पेटकुले पॅनलला सातपैकी पाच जागा मिळाल्या. तर असोलीमध्ये शिवसेनेचे अनिल रुणवाल यांच्या अविरत सत्ता प्रवासाला ब्रेक लागले असून येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांचे चिरंजीव वेदांत जाधव यांच्या पॅनेलने जबरदस्त मुसंडी मारली असून नऊपैकी नऊ जागा ताब्यात घेत शिवसेनेला जोरदार हादरा दिला आहे. तर आष्टा मध्ये विजयाची हॅट्रिक कायम ठेवत प्रा. राजेंद्र केशवे पुरस्कृत पॅनेलने नऊपैकी नऊ जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. हरडफमध्ये मागील पंधरा वर्षापासून सत्तेत असलेल्या माकपा गटाला झटका देत उपसभापती उमेश जाधव, भाजपाचे देवकुमार पाटील व दीपक किनाके यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. 

एकंदरीत हाती आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानुसार माहूर तालुक्यातील दहा ग्रामपंचायत मधून अधिकांश ग्रामपंचायत मध्ये प्रस्थापितांना धक्का देत मतदारांनी नवा गडी....नवा डाव म्हणत तरुणांना संधी दिली आहे. राजकीय समीकरणानुसार वाई बाजार गटामध्ये शिवसेनेचा प्रभाव ओसरल्याची स्थिती सध्याच्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरुन दिसून येते. तहसील कार्यालयाच्या सभागृहात तीन टेबलवर दहा वाजता टपाली मतदान पासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. निर्विवाद मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी म्हणून तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, व्ही. व्ही. गोविंदवार, निवडणूक निर्णय अधिकारी एम. आर. चिटकुलवार, एम. आर. सूर्यभान, सी. सी. कंठाळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी केली. निवडणूक निकाला दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माहूर आणि सिंदखेड पोलिसांनी चोख बंदोबस्ताची व्यवस्था केली होती.

गड आला...पण सिंह गेला...

माहूर तालुक्यातील बहुचर्चित सर्वांचे लक्ष लागलेल्या सिंदखेड व सेलू ग्रामपंचायतमध्ये अनुक्रमे मोहन लागेलवार व अतिश पेटकुले या दोन्ही पॅनल प्रमुखांच्या पॅनलचे सातपैकी पाच एवढे उमेदवार निवडून आले आहे. परंतु पॅनल प्रमुखांचं अगदी अल्पशा मताने निसटता पराभव झाला आहे. त्यामुळे ‘गड आला...पण सिंह गेला’या म्हणीची प्रचिती सिंदखेड आणि सेलू गावात आली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Mahur, Shiv Sena's Panipat in the Wai Bazar group pushed the established in seven out of ten places nanded news