मनिरामखेड प्रकल्प राजकीय अनास्थेच्या गर्तेत

vai.jpg
vai.jpg

वाई बाजार, (ता.माहूर, जि. नांदेड) ः माहूर तालुक्यातील एकमेव मनिरामखेड-वायफणी येथील मनिरामखेड बृहत लघुपाटबंधारे सिंचन प्रकल्प दोन वर्षांखाली पूर्णत्वास जाऊनदेखील राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कंत्राटदारासोबत असलेले मधुर संबंध आड येत असल्याने बाधित कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी नवीन वसाहत प्रकल्पाचे काम कासव गतीने होत आहे. प्रकल्पाची घडभरणी झाली नाही. पर्यायाने पाणी साठवण करणे थांबले आहे. शेकडो शेतकऱ्यांचे विस्थापन होऊन कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पाचे उपयोग शून्य असल्याने पुनर्वसन वसाहत कार्याला गती देण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार संजय राठोड यांच्याकडे केली आहे.

तब्बल नऊ वर्षांपासून रखडलेल्या मनिरामखेड बृहत लघुसिंचन प्रकल्पात वायफणी हा संपूर्ण गाव विस्थापित झाल्याने एकूण २३५ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन नवीन वसाहतीत होणार असून नागरी सुविधा जसे शाळा, क्रीडांगण, समाज मंदिर, अंगणवाडी, अंतर्गत रस्ते, प्रवासी निवारा, पाणीपुरवठा योजना, वीजपुरवठा कार्यान्वित करणे आदी सुविधा उपलब्ध करून देणे. या प्रकल्पाचे कंत्राट नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम कंपनीला सुटले होते. पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन तारीख एक जुलै २०१८ रोजी मोठ्या थाटात तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते तत्कालीन स्थानिक लोकप्रतिनिधी, पाटबंधारे, वन विभाग व महसूल विभागाच्या डझनभर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले होते. 

घडभरणी करून पाणी अडविले

या प्रकल्पामुळे एक हजार दोनशे हेक्टर इतके क्षेत्र ओलिताखाली येणार असून ११.८६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण होणार आहे. पुनर्वसन प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण झाले असते तर जून २०१९ मध्ये घडभरणी करून पाणी अडविले जाणार होते. परंतु, दोन वर्षांपासून पुनर्वसन प्रकल्पाचे काम कासव गतीने चालू असल्याने अजून चार - दोन वर्षे हे प्रकल्प पूर्णत्वास जाणार नसल्याचे संकेत सध्या सुरू असलेल्या कामाच्या गतीवरून निदर्शनास येते. तत्कालीन लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या भूमिपूजन वेळेस दाखविलेली लगीनघाई दोन वर्षांपासून मात्र भिजत घोंगडे म्हणून बसल्याने माहूर तालुक्यातील एकमेव सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जाईल की नाही, यासंदर्भात साशंकता निर्माण झालेली आहे.

मनिरामखेड बृहत लघुपाटबंधारे तलावाचे काम सुरू होऊन नऊ वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. परंतु, अद्याप घडभरणी झालेली नाही. मतदारसंघातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी या हेतूने प्रेरित हे प्रकल्प पुनर्वसन वसाहतीच्या कामाची संथ गतीमुळे रखडल्याचे आणि विहीत मुदतीत घडभरणी झाली नसल्याने पाणी अडविले गेले नाही. तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष कायम असताना कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे प्रकल्प आज घडीला तरी निरूपयोगी ठरत आहे.
- भीमराव केराम, आमदार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com