
आत्ता सर्वच पॅनलप्रमुख व निवडूण आलेल्या सदस्यांचे लक्ष आता शुक्रवारी (ता. 29) निघणाऱ्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे.
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : ग्रामपंचायत निवडणूकीत पाण्यासारखा पैसा खर्च करुन निवडून आलेल्या पॅनलप्रमुखांनी आपल्या मनासारखे आरक्षण सुटावे यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. जर आरक्षणाने दगाफटका दिल्यास सर्व परिश्रम, पैसा पाण्यात जाणार आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीबाबत खूप मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आत्ता सर्वच पॅनलप्रमुख व निवडूण आलेल्या सदस्यांचे लक्ष आता शुक्रवारी (ता. 29) निघणाऱ्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे.
अर्धापूर तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीची निवडणुक प्रक्रिया पार पडली आहे. निवडणूक होण्यापुर्वी तालुक्यातील 46 ग्रामपंचायतीचे आरक्षण घोषित करण्यात आले होते. सरपंचपदाच्या लिलावाच्या घटना जिल्ह्यासह राज्यात काही ठिकाणी झाल्यानंतर राज्य शासनाने सर्व जिल्ह्यातील सरपंचपदांचे आरक्षण रद्द केले होते. त्यानंतर निवडणुका पार पडल्या आहेत.
तालुक्यातील 46 ग्रामपंचायतीपैकी 23 ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच होतील. तसेच अनुसुचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षण काढण्यात येईल. ही आरक्षण सोडत शुक्रवारी (ता. 29) काढण्यात येणार असून त्यासाठी तहसीलदारांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ही सोडत तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडेल.
यंदाच्या निवडणुकीत पैसा हा महत्त्वाचा घटक ठरल्याने छोट्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काही लखात खर्च झाल्याने निवडून आलेल्या सदस्यांना आता आरक्षणाची चिंता लागली आहे. कर्माने निवडून आले पण सोडतीच्या नशीबात कमी पडू नये यासाठी सध्या तरी स्थानिक लोकप्रतिनिधीनी आपले देव पाण्यात ठेवले आहेत.
संपादन- प्रल्हाद कांबळे