esakal | Nanded : पुराच्या पाण्यात शिवार बी गेलं अन् शेत बी गेलं
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded : पुराच्या पाण्यात शिवार बी गेलं अन् शेत बी गेलं

Nanded : पुराच्या पाण्यात शिवार बी गेलं अन् शेत बी गेलं

sakal_logo
By
सुनील पौळकर

मुखेड : यंदा पेरणी पासूनच धरसोड करत असलेल्या पावसाने पीके तग धरतील की नाही अशी अपेक्षा असतानाच अधून-मधून झालेल्या सलग व जोरदार पावसामुळे पीके चांगली आली असली तरी बऱ्याच ठिकाणी पुराचा फटका बसला होता. नगदी पीके असलेल्या उडीद, मुग पिक एन काढणीला आल्याचा मुहूर्त साधून पुन्हा पावसाने जोर मारला. यात हाता तोंडाचा घास हिरावून गेला. काही ठिकाणी राहिलेल्या सोयाबीनच्या शेतात आठ-दहा दिवस पाणी साचून असल्याने शेतामध्ये जाणे शक्य नव्हते. तर शेतात राहिलेले मुग उडदाचे काही ढिगारे भिजल्याने त्यांना कोंब फुटून डोळ्या देखत त्यांची नासाडी झाली.

तालुक्यात मन्याडीलगत असलेल्या गावामध्ये चिवळी, बेरळी, खरबखंडगांव, सलगरा, नारनाळी (ता.कंधार) या गावाचा समावेश होता. वरच्या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे शिकारा, जुन्ना, शिरूर दबडे, वर्ताळा, बारूळ (ता. कंधार) येथील लहान मोठी सर्वच नाले, ओढे व लघु प्रकल्प ओव्हर फ्लो झाले.

पंचनामा करण्याच्या सूचना

मन्याडीच्या पुरामुळे नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतापर्यंत पोचता येत नसल्याचे शेतकऱ्यांनी व्यथित होऊन सांगितले. मागील आठ दिवसामध्ये मात्र आमदार डॉ. तुषार राठोड, तहसीलदार काशीनाथ पाटील, गटविकास अधिकारी तुकाराम भालके आदी आजी-माजी नेत्यांनी गावाच्या वेशीवर येऊन नदीची काठ पाहणी केली व पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. असे असले तरी शेतात काहीच उरले नाही, आता पंचनामा तर कशाचा करावा असा प्रश्न तलाठी व कृषी सहाय्यकांना पडला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जिथे आभाळचं फाटल तिथे कुठं कुठं शिवणार. निसर्गाची अवकृपा झाल्यामुळे मायबाप सरकार तरी कुठवंर पुरेल, नुकसान आता झालय गरज आता पाहिजे पण या आजी माजी नेत्यांची पाहणी अन् भरपाई कधी होणार देव जाणे. मदत आली तरी कोणत्या साली येईल अन् किती नियम अटी लावील याचा भरवसा नाही.

- ज्ञानेश्वर इंगोल, शेतकरी, बेरळी.

loading image
go to top