Video - नांदेडमध्ये सामुहिक तुलसी विवाहातच बांधली रेशीमगाठ 

प्रमोद चौधरी
Tuesday, 1 December 2020

जुना कौठा येथील नरोबा लक्ष्मी नृसिंह मंदिर संस्थानतर्फे सोमवारी (ता.३०) सामुदायिक तुलसी विवाह झाला. त्यामध्ये एका गरीब कुटुंबातील आरती किशन धोणे (रा. मनाठा) हिचा शिवकुमार भानुदास धाकपाडे (रा. जुना कौठा) यांच्यासोबत हजारो वऱ्हाडींच्या साक्षीने रेशीमगाठ बांधून धार्मिक कार्यक्रमाला सामाजिकतेची झालर दिली. 

नांदेड : सण-उत्सव हे समाजामध्ये एकता नांदावी, संस्कृतीची जोपासना व्हावी, सामाजिक परिवर्तन घडावे म्हणून वर्षानुवर्षे साजरे करण्याची परंपरा समाजामध्ये आहे. त्यानुसारच जुना कौठा येथील नरोबा लक्ष्मी नृसिंह मंदिर संस्थानतर्फे सोमवारी (ता.३०) सामुदायिक तुलसी विवाह झाला. त्यामध्ये एका गरीब कुटुंबातील आरती किशन धोणे (रा. मनाठा) हिचा शिवकुमार भानुदास धाकपाडे (रा. जुना कौठा) यांच्यासोबत हजारो वऱ्हाडींच्या साक्षीने रेशीमगाठ बांधून धार्मिक कार्यक्रमाला सामाजिकतेची झालर दिली. 

शहरापासून जवळच असलेल्या जुना कौठा येथे नरोबाचे (नृसिंह) तीनशे वर्षांपूर्वीचे पुरातन मंदिर आहे. कौठावासीयांचे ते ग्रामदैवत आहे. या मंदिरात धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध सामाजिक उपक्रमही राबविले जातात. सर्व पुरुष-महिला एकत्रे येवून प्रत्येक सण-उत्सव एकोप्याने साजरा करतात. त्यामध्ये आषाढी, कार्तिकी एकादशी, हळदीकुंकु कार्यक्रम, दीपावली स्नेहमीलन, सामुदायिक तुलसी विवाह असे विविध सण-उत्सव एकोप्याने साजरे करण्याची परंपरा मंदिर संस्थानच्या वतीने जोपासली जात आहे. 

हेही वाचा - परभणीतून नऊ हजार ६०० रुपयांच्या खोट्या नोटा जप्त

मंदिर संस्थानतर्फे होत असलेल्या सामुदायिक तुलसी विवाहामध्ये २०१३ पासून गरीब कुटुंबातील जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधण्याच्या उपक्रमाला संस्थानने सुरुवात केली. त्याला जुन्हा कौठा येथील ग्रामस्थांचेही मोठे बळ मिळाले. तेव्हापासून हा उपक्रम अखंडित सुरु आहे. प्रत्येक वर्षी कार्तिक पौर्णिमेला नृसिंह जयंती उत्सव साजरा होतो. या उत्सवाचा समारोपत सोमवारी सामुदायिक तुलसी विवाहाने झाला. त्यानंतर गरीब कुटुंबातील आरती किशण धोणे आणि शिवकुमार भानुदास धाकपाडे या जोडप्यांची रेशीमगाठ हजारो वऱ्हाडींच्या साक्षीने तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत बांधण्यात आली. 

हे देखील वाचाच - नांदेड - बसस्थानकाला नामफलकाचा विसर

मंगलाष्ट्कांना मंजुर स्वर 
कुठल्याही शुभकार्याला मंजूळ स्वरांची जोड दिली तर उत्साहाला उधाण येते. नरोबा मंदिर परिसरात सोमवारी सामुदायिक तुलसी विवाहानिमित्त आयोजित संगीत रजनीमध्ये भावगीतांनी उपस्थित वऱ्हाडींचे लक्ष वेधलेच;शिवाय मंगलाष्टकांनाही सांगितिक साजशृंगार चढविल्याने वातावरण उल्हासीत झाले होते. 

येथे क्लिक कराच - विधायक बातमी : लोकसहभागातून तयार होणारा पुल पूर्णत्वाकडे एकीचे ज्वलंत उदाहरण

तुलसी विवाह स्पर्धा 
सामुहिक तुलसी विवाहानिमित्त तुलसी सजावट स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रथम यमुनाबाई ओमप्रकाश बडे, द्वितीय सुमित्रा बालाजी कटकमवार, तृतीय श्रावणी डहाळे तर चौथा क्रमांक अनिता ठाकूर यांनी पटकावला. त्यांना नगरसेवक राजू काळे पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष गंगाप्रसाद काकडे, नीळकंठ काळे, अशोक दिलेराव, मारोती पासवाड, बालाजी सोनवळे देऊनळगावकर, विनोद काकडे आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marriage Arranged By Poor Family By Naroba Mandir Sansthan Nanded News