esakal | कोरोनात पाऱ्याचा कहर ः नांदेडचा पारा ४० अंशांवर; आगामी दिवस ठरणार तापदायक

बोलून बातमी शोधा

hot sun
कोरोनात पाऱ्याचा कहर ः नांदेडचा पारा ४० अंशांवर; आगामी दिवस ठरणार तापदायक
sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड ः जिल्ह्यात कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या वाढत असतानाच गुरुवारी (ता. २२) उन्हाच्या तिव्र चटक्यांमुळे पाऱ्याने सुद्धा ४० अंशावर मजल मारली. शुक्रवारी (ता. २३) दिवसभर आभाळ असलेतरी पुढील आठ दिवस आकाश निरभ्र राहणार असल्याने आगामी दिवसांत नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेचा अधिक सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे झाले आहे. त्यासोबतच उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह सुद्धा थांबला आहे. परिणामी हिवाळा संपला असून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्याचे दिसून आले होते. त्यामुळे मार्चच्या सुरुवातीलाच जिल्ह्याचे कमाल तापमान चाळीशीकडे आगेकूच करत होते.

हेही वाचा - खबरदारी घेऊ, कोरोनावर मात करु- डॉ. प्रदीप आवटे

दरम्यान आता आकाश निरभ्र असल्याने सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ४० अंश सेल्सियसवर पोहचले. दिवसभर नागरिकांना उन्हाचे चटके जाणवू लागल्यामुळे घरात पंख्याचा व घराबाहेर झाडाच्या सावलीचा आसरा नागरिक घेताना दिसत आहे. नेहमीप्रमाणेच यावर्षी सुद्धा उन्हाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांना उन्हाळा चांगलाच घाम फोडणार आहे.

किमान तापमानात सुद्धा वाढ ः

गत आठवड्यातील पावसानंतर आता आकाश निरभ्र झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातून थंडी व ढगाळ वातावरण गायब झाले असून रात्रीचे (किमान) तापमान सुद्धा वाढत आहे. रात्रीच्या वेळी सुद्धा नागरिकांना उकाडा जाणवत असल्याने अनेक घरांमध्ये कूलर सुरू झाले आहेत.

आगामी दिवसांत होणार लाहीलाही ः

जिल्ह्यात उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने आगामी दिवस नागरिकांसाठी ‘तापदायक’ ठरतील. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच सूर्याने आग ओकण्यास सुरूवात केल्यामुळे उन्हाचे तीव्र चटके जाणवत असल्याने आगामी दिवसांत नांदेडकरांची प्रचंड लाहीलाही होणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे