Nanded : सूक्ष्म व लघुउद्योग अस्थिरतेच्या गर्तेत ; उद्योगांसमोर अडचणींचा डोंगर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लघुउद्योग

सूक्ष्म व लघुउद्योग अस्थिरतेच्या गर्तेत ; उद्योगांसमोर अडचणींचा डोंगर

नांदेड : इंधनासोबतच लोखंड आणि इतरही कच्च्या मालाचे दर वाढल्याने लघू आणि सूक्ष्म उद्योजकांचा नफा कमी झाला आहे. त्याचे दूरगामी परिणाम उद्योगांवर पडत असून, सूक्ष्म व लघुउद्योग अस्थिरतेच्या गर्तेत सापडले आहेत. कच्च्या मालाची अशीच दरवाढ सुरु राहिल्यास उद्योग चालवणे कठीण होणार असल्याचे उद्योजकांचे मत आहे.

शिवाजीनगर, सिडको तसेच कृष्णूर औद्योगिक परिसरात सुमारे ५० ते ६० टक्के लघू आणि मध्यम उद्योग आहेत. गेल्या दीड वर्षांपासून कोरोना संकटाचा कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. अनेक उद्योग बंद झाले असून, मोठ्या प्रमाणात कामगार कपात करण्यात आली. आता पूर्णक्षमतेने उद्योग सुरु झाले असून, अर्थचक्र गतिमान होत आहे. अशा स्थितीत इंधन आणि कच्च्या मालाची सतत होणारी दरवाढ उद्योजकांच्या अडचणी वाढविणारी आहे. इंधन दरवाढीमुळे माल पाठविण्यासाठी आणि कच्चा माल आणण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते.

कंपन्यांसोबत झालेल्या करारानुसार मालाचा पुरवठा करावा लागतो. मोठ्या कंपन्या अथवा संस्थांसोबत केलेल्या कराराची पूर्तता न केल्यास पुन्हा आॅर्डर मिळणार नाही, या भीतीने सर्वच उद्योजक मालाचे उत्पादन करून पुरवठादारांना पुरवीत आहेत. द्विधा मनस्थितीत सापडलेल्या उद्योजकाना रोज नवीन संकटाला तोंड द्यावे लागत आहे. लोखंडाचे दर सतत वाढत असल्याने पूर्वी तीन दिवस किमान एकच किंमत राहण्याची हमी व्यावसायिक देत होते. आता तेही फक्त तीन तासाची हमी घेऊन आॅर्डर नोंदविण्याचा सल्ला देतात. कारण सतत तीन ते चार तासानंतर किमतीत चढ-उतार होत असल्याचे उद्योजक सांगतात. त्यामुळे उद्योगांमध्ये अस्थिरता आली. परिणामी पुढे उत्पादन करावे की नाही अशाही विचारात काही उद्योजक आहेत. भाववाढ कायम राहिल्यास अनेक उद्योगांना टाळे लागण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

नवनवीन आव्हानांना तोंड द्यावे लागतेय

इंधन, स्टीलच्या दरवाढीने लघू, सूक्ष्म उद्योगांसमोर अडचणींचा डोंगर उभा आहे. कमी नफ्यात व्यवसाय करण्याची वेळ आली आहे. त्याचे परिणाम येत्या काळात दिसतील. सद्यस्थितीत उद्योजकांचे भविष्य धूसर झाले आहे. सरकारने महागाईवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. कोरोनाच्या फटक्यातून अद्याप सावरलेले नसताना रोज नवनवीन आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. हे आता सहन करण्यापलीकडे आहे.

loading image
go to top