नांदेडमध्ये ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद, विरोधी पक्षांसह शेतकरी संघटना, व्यापाऱ्यांचा बंदमध्ये सहभाग 

प्रमोद चौधरी
Tuesday, 8 December 2020

नांदेडला शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यासाठी मंगळवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत महाविकास आघाडीतर्फे जोरदार निदर्शने करून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महिला कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता.

नांदेड :  केंद्राच्या कृषी विषयक कायद्यांना विरोध करत दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या भारत बंदला नांदेड जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंद दरम्यान जीवनावश्यक प्रतिष्ठाने सुरू होती. शहरासह ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी विरोधी पक्ष तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना, व्यापाऱ्यांनीही बंदमध्ये सहभाग नोंदवला. जिल्ह्यात बंद शांततेत पार पडला. या बंदमध्ये रयत क्रांती संघटना तसेच शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचा सहभाग मात्र नव्हता. 

केंद्र शासनाने लागू केलेल्या कृषीविषयक कायद्याच्या विरोधात मंगळवारी (ता. आठ) पुकारलेल्या देशव्यापी ‘भारत बंद’ला नांदेड जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला. शहरात जीवनावश्यक प्रतिष्ठाने सुरू होती. एसटी महामंडळाच्या बसेस तुरळक धावत होत्या. यासोबतच शहरातील रिक्षाही कमी प्रमाणात होते. इतर प्रतिष्ठाने मात्र तुरळक बंद होती. जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाकप, माकप, वंचित बहुजन आघाडी, अखिल भारतीय छावा आदींनी बंदमध्ये सहभाग घेऊन निदर्शने केलीत. 

हेही वाचा - Bharat Bandh Updates : परभणीत शेतकरी कायदा विरोधात जिल्ह्यात कडकडीत बंद

ग्रामीण भागातही बंदचे पडसाद पाहायला मिळाला. मालेगाव (ता. अर्धापूर) येथे शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, काँग्रेसकडून शिवाजी चौकामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाशिष कामेवार, शिवसेनेचे सुदाम चौरे, शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले, मनोज इंगोले, दिनेश कदम, संतोष कदम, बंडू कदम, प्रकाश इंगोले, पिंटू तारू, आदींची उपस्थिती होती. किनवटमधील इस्लापूर येथे किसान सभेच्यावतीने निदर्शने करण्यात आली. लोहा तालुक्यातील दगडगाव येथे महिलांसह शेतकऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. 

हे देखील वाचाच - Bharat Bandh Updates : हिंगोलीत भारत बंदला मोठा प्रतिसाद

यासोबतच कंधार, मुखेड, अर्धापूर, भोकर, किनवट, माहूर, नायगाव, बिलोली, धर्माबाद, देगलूर, लोहा, उमरी, हदगाव, हिमायतनगर, मुदखेड आदी तालुक्यातही बंद दरम्यान निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डाव्या पक्षाकडून निदर्शने करण्यात आली. नांदेडमधील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बंद दरम्यान निदर्शने करून केंद्र शासनाचा निषेध केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mixed Response To Bharat Bandh In Nanded Nanded News