विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी प्रा. यशपाल भिंगे मुंबईत 

शिवचरण वावळे
Saturday, 7 November 2020

प्रा. यशपाल भिंगे यांना वंचित बहुजन आघाडी पक्षाने सर्वप्रथम २०१९ मध्ये लोकसभेसाठी नांदेड प्रा. भिंगेंना निवडणूक लढविण्यासाठी संधी दिली होती.

नांदेड - वंचित बहुजन पक्षाचे प्रा. यशपाल भिंगे यांना राष्ट्रवादीकडून आमदारकीची लॉटरी लागण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. वंचितला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीकडून प्रा. यशपाल भिंगे यांच्या नावाला पसंती दिली जात असल्याने भिंगेंच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आमदाराकीची लॉटरी लागण्याची खात्री असल्याने प्रा. भिंगे मुंबईत ठाण मांडुन आहेत. 

प्रा. यशपाल भिंगे यांना वंचित बहुजन आघाडी पक्षाने सर्वप्रथम २०१९ मध्ये लोकसभेसाठी नांदेड प्रा. भिंगेंना निवडणूक लढविण्यासाठी संधी दिली होती. भिंगेंसारखी अभ्यासू व्यक्ती वंचित पक्षात असल्याने पक्ष कार्यकर्त्यांचे मनोबल आणि वजन वाढल्याचे दिसून येत होते. मात्र लोकसभेला त्यांचा पराभव झाल्यापासून ते वंचित पक्षाच्या बैठका किंवा इतर कार्यक्रमास त्यांचा सहभाग कमीच असायचा. दुसरीकडे नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद सोडले, तर पक्षाची मोट बांधणी व्हावी तशी होत नाही. 

हेही वाचा- नांदेड : धनादेशावर खाडाखोड करून दोन लाखांची फसवणूक करणारा ग्रामसेवक बेपत्ता ​

ओबीसी समाजात चैतन्याचे वारे 

अगदी बोटावर मोजता येतील इतक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतच कार्यक्रम होतात. त्यामुळे राष्ट्रवादीची घोडदौड थांबल्यासारखी दिसत असल्याने पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देण्याच्या हेतुने राष्ट्रवादी पक्षाकडून धनगर समाजाचा ओबीसीचा चेहरा असलेले प्रा. यशपाल भिंगे यांच्या नावाला पसंती दर्शवली असल्याचे समजते. त्यामुळे ओबीसी समाजात आतापासूनच चैतन्याचे वारे वाहु लागल्याचे बघायला मिळत आहे. 

सोशल मीडियातून भिंगे यांच्यावर खोचक टिका 

तर दुसरीकडे वंचित सोडून राष्ट्रवादीची घड्याळ हातावर बांधण्यास तयार असलेले प्रा. भिंगे यांच्याबद्दल वंचित बहुजन आघाडी पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच नाराजी पसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून भिंगे यांच्यावर खोचक टिका करताना दिसून येत आहेत. 

हेही वाचले पाहिजे- दूर्दैवी घटना : पती- पत्नीच्या पन्नास वर्षांचा प्रवास एकाच दिवशी संपला, परिसरात हळहळ ​

राज्यपालाच्या आदेशाकडे सर्वांचे लक्ष

असे असले तरी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेली बाराच्या बारा नावास राज्यपाल भगतसिंग कोशियारी हे जशास तसे स्वीकारणार नाहीत. असे अनेक राजकीय विश्‍लेषक जानकार यांना वाटते. त्यामुळे विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधुन बसलेले प्रा. भिंगे मुंबईत दाखल झाले असले, तरी राज्यपालांकडून रेड या ग्रीन सिग्नल मिळतो का? हे बघणे गरजेचे आहे. 

माझ्या नावाची चर्चा 
मी आमदारकीसाठी उत्सुक असलो, तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडून पाठवलेल्या १२ जागेबद्दल जोपर्यंत निर्णय होणार नाही, तोपर्यंत वेट ॲन्ड वॉचची भूमिका आहे. माझ्या नावाची चर्चा असल्याने धनगर समाजात आनंदाचे वातावरण आहे. 
प्रा. यशपाल भिंगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the MLA of the Legislative Council, Pro Yashpal Bhinge in Mumbai Nanded News