नांदेड शहरात मोबाईल चोरटे सक्रिय, कुठे आहे डीबी पथक...?

file photo
file photo

नांदेड : शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरफोड्या, चोऱ्यांचे सत्र सुरु असताना पुन्हा आता शहरात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरीचे प्रकार वाढले आहे. दुचाकीस्वार चोरटे हे सकाळी फेरफटका मारणाऱ्यांवर किंवा एकट्या जेष्ठ नागरिकाना गाठून त्यांचा मोबाईल किंवा किंमती सामान पळवित आहेत. असाच एक प्रकार सकाळचा फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या एका अधिकाऱ्याचा मोबाईल पळविल्याची घटना विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

शहरातील कुठल्याही रस्त्यावर फिरणे तसेच मोबाईलवर बोलणे अवघड होऊन बसले आहे. विशेष म्हणजे विकास हटकर गोळीबार प्रकरणानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शहरातील सर्व गुन्हे शोध (डीबी) कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून चांगलीच झाडाझडती घेतली होती. ठाण्याच्या हद्दीत वावरणाऱ्या गुन्हेगारावर नजर ठेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गुन्हेगार ऐकत नसतील तर जशास तसे उत्तर देण्याची अधिकाऱ्याने स्पष्ट केले होते. मात्र मोबाईल चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍न उपस्थित होत आहे. मोबाईल चोर सापडत नसतील तर घरफोड्या आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपी कधी सापडतील असा प्रश्न निर्माण होत आहे.

एकाच दिवशी तिघांची मोबाईल चोरीला

भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वामनराव पावडे मंगल कार्यालय परिसरात भरणाऱ्या तात्पुरत्या बाजारात सकाळी सात वाजताच्या कालावधीत तिघांचे मोबाइल लंपास करण्यात आले. भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या लोकांना त्याचा फटका बसला. या प्रकरणी मोबाईल धारकांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याचा सोपस्कार पूर्ण केला. उलट मोबाईलधारकाची उलट तपासणी करुन त्यांना भंडावून सोडले. 

आठवडी बाजार चोरट्यांचे केंद्र 

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये शुक्रवारी भरणारा बाजार, जूना कौठा परिसरातील बाजार, इतवारा परिसरातील भरणारा बाजार हे मोबाईल चोरट्यांचे केंद्र बनले आहे. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढले जात आहे. चोरलेला मोबाईल व त्यातील महत्त्वाचा डाटा लंपास होत असल्याने मोबाईलधारक भयीत झाले आहेत. मोबाईल घेऊन बाजारात गेलेच कसे असा प्रश्न विचारल्या जातो. मोबाईल गुन्हा दाखल करुन घेण्याऐवजी हरवल्याची नोंद करून तक्रारदाराची बोळवण केली जात असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. 

डीबी पथक भलत्याच कामात व्यस्त

आतापर्यंत चोरीला गेलेला मोबाईल आणि चोरट्यांकडून हस्तगत केलेल्या मोबाईलच्या संख्येत मोठी तफावत असल्याने चोरीचे मोबाईल कुठे जातात हा शोधाचा विषय आहे. संबंधीत ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढत असेल तर त्यावर पोलिस निरीक्षकांसह डीबी पथकाकडून नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. रस्त्यावरून जात असताना मोबाईल हिसकावून घेण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या बाबीकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com