esakal | आधुनिक मराठवाड्याचे भगीरथ तथा प्रशासनातील "हेडमास्तर"  डॉ. शंकरराव चव्हाण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

महाराष्ट्रात नररत्नांची खाण नसेल तरच नवल. या इथल्या काळ्या कसदार भुईने पिढ्यांपिढ्यांचे भरणपोषण केले आहे,

आधुनिक मराठवाड्याचे भगीरथ तथा प्रशासनातील "हेडमास्तर"  डॉ. शंकरराव चव्हाण

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : सुसंस्कृतता आणि पुरोगामित्व यात महाराष्ट्र सदैव अग्रेसर राहिला आहे. भीमा, कोयना, गोदा, कृष्णा यांच्या पात्रातून सातत्याने स्वाभिमानाचे त्यागाचे लोककल्याणाचे पाणी गेली हजारो वर्षे वाहते आहे. याच महाराष्ट्रात नररत्नांची खाण नसेल तरच नवल. या इथल्या काळ्या कसदार भुईने पिढ्यांपिढ्यांचे भरणपोषण केले आहे, येथल्या सह्याद्रीने महाराष्ट्रभूच्या मर्दानी छातीला प्रसंगी ढाल करावयाची दीक्षाही दिली आहे.

अपार सिंधुच्या भव्य बांधवा, 
महाराष्ट्र देशा !
सह्याद्रीच्या सख्या, 
जिवलगा, महाराष्ट्र देशा !!

ही थोरवी खुद्द कविवर्य गोविंदाग्रजांनीच वर्णिली आहे. याच महाराष्ट्राच्या संस्कारांची छाप छातीवर घेऊन खडा ठाकलेला प्रदेश म्हणजेच "मराठवाडा". याच मराठवाड्याने आपल्या पोलादी मनगटातील बळाचा, शौर्याचा परिचय अनेक वेळा दिला आहे. त्याचे दर्शन कित्येकदा जगाला घडवले आह.

ता. एक मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेतली व अतिशय समर्थपणे राज्याची धुरा सांभाळली. त्यांना "आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार" संबोधले गेले. यशवंतराव चव्हाणांची कळवळ्याचं राजकारण व आत्मीयतेचं समाजकारण करण्याची परंपरा डॉ. शंकराव चव्हाण साहेबांनी पुढे चालवली व जलक्रांती करुन या महाराष्ट्राचे "आधुनिक भगीरथ" संबोधले गेले. 

बा.भ. बोरकरांनी आपल्या अजरामर काव्यातून या ध्यासपंथावर चालणाऱ्या पाऊलांचे वर्णन केले आहे. ते स्व. चव्हाण साहेबांना लागू होते,

"देखणी ती पाऊले, 
जी ध्यासपंथे चालती ।
वाळवंटातून सुद्धा, 
स्वस्तिपद्मे रेखीती" ।।

पैठणसारख्या ज्ञान क्षेत्री भाऊराव चव्हाण यांच्या अत्यंत साधारण वारकरी संप्रदायाच्या विचारांवर चालणाऱ्या कुटुंबात ता. १४ जुलै १९२० रोजी जन्मलेल्या शंकररावजींचे प्राथमिक शिक्षण पैठणक्षेत्रीच झाले. अभ्यासात विशेष गती असलेल्या शंकररावांनी उच्च शिक्षणासाठी हैद्राबाद गाठले त्या काळी हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाचा शिक्षण शिक्षण क्षेत्रात विशेष दबदबा होता. याच विद्यापीठातून ते बी. ए. व पुढे एल. एल. बी. झाले त्या काळी वकिली पेशा हा प्रतिष्ठेचे लक्षण मानला जात असे. 

१९४५ मध्ये त्यांनी वकिलीची सनद मिळवली. त्याच वेळी स्वामी रामानंद तीर्थ हे मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करत होते आणि ऐन पंचविशीतले तरुण शंकराव हे स्वामी रामानंद तीर्थांच्या देशप्रेमाच्या विचाराने भारले गेले होते. त्याच वेळी त्यांनी रामानंद तीर्थ यांच्या सल्ल्यावरून मराठवाडा मुक्तीच्या लढ्यात स्वतः ला झोकून दिले. ते प्राणपणाने लढले. उमरखेड तालुक्यातील पुसद हे गाव त्यांच्या कार्याचे केंद्र होते. अखेर सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांना यश आले व ता. १३ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलिन झाले. ही घटना डॉ. शंकरराव चव्हाणांच्या आयुष्याला दिशा देणारी ठरली आणि ते सक्रिय राजकारणात सहभागी झाले. त्यांच्या आयुष्याला येथेच कलाटणी  मिळाली. कोणास माहीत होते, की  हाच तरुण पुढे संपूर्ण देशाचे वेगवेगळ्या भूमिकांमधून नेतृत्व करणार होता. त्याच दरम्यान अर्थात, १९४८- ४९ मध्ये ते नांदेड जिल्हा कॉंग्रेसचे ते सरचिटणीस झाले. त्यानंतर राजकीय जीवनाचा त्यांनी स्वीकार केला. त्यांच्या मागील जनाधारही वाढत गेला. निवडणूक लढवण्यास ते सज्ज झाले; पण १९५२ मध्ये त्यांना पराभवास सामोरे जावे लागले; तरीही या अपयशाने ते खचले नाहीत. आपल्या झालेल्या चुकातून त्यांनी नवा धडा घेतला. त्यानंतर त्यांनी नांदेड नगरपालिकेत काम केले. सहकारक्षेत्र व कामगारवर्गाच्या कामांतही त्यांनी सहभाग घेतला.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते सहभागी झाले. भाषावर प्रांतरचनेतही त्यांनी आपला सहभाग नोंदवला. पुढे १९५६ साली उपमंत्री झाले. ता. एक मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दूरदृष्टीच्या आणि अनुभवी बुद्धिमान लोकांना आपल्या मंत्रिमंडळात संधी दिली. त्यात डॉ. शंकरराव चव्हाण यांच्याकडे त्यांनी अतिशय विचारपूर्वक पाटबंधारे खात्याची जबाबदारी टाकली होती आणि त्या विश्वासाला जागत शंकररावांनी फार मोलाची कामगिरी केली. त्यानंतर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर आलेल्या वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात १९७२- ७५ मध्ये ते कृषीमंत्री होते. हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्रातल्या कृषीक्रांतीचे जनक असलेल्या वसंतराव नाईक यांनी कृषीखाते डॉ. शंकरराव चव्हाण यांच्याकडे  देण्यामागे मागे फार मोठा विचार आणि विश्वास होता. तो त्यांनी पुढील काळात सार्थ ठरवला. १९७५ मध्ये राजकीय समीकरणे बदलली व प्रदीर्घकाळ सक्रिय राजकारणात असलेल्या, गांधी- नेहरुंचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याऱ्या डॉ. शंकरराव चव्हाणांकडे मुख्यमंत्रीपद आले, त्यामागे त्यांनी आजपर्यंत निष्ठेने केलेली लोकसेवा व लोकांच्या कल्याणासाठी अहोरात्र वाहिलेली काळजी होती. मराठवाड्याची मान अभिमानाने ताठ झाली. मागास म्हणून हिणवल्या जाणाऱ्या मराठवाड्याकडे मुख्यमंत्रीपद आले होते डॉ. शंकरराव चव्हाण यांनी सामान्य माणसाला व व्यवस्थेतील शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून कार्य केले. पाटबंधारे क्षेत्रात त्यांनी आपला असा अमीट ठसा उमटवला की त्यास काळही पुसू शकणार नाही.

शंकरराव चव्हाण साहेब यांनी अनेक पाटबंधारे प्रकल्प पूर्ण केले, यात वेगवेगळ्या लघु व मध्यम प्रकल्पांचा समावेश होतो. शेतकऱ्यांच्या यातनांचा व परिस्थितीचा विचार करून त्यांनी त्यांच्या बांधापर्यंत पाणी आणले व शेतकऱ्यांच्या आयुष्याची बाग फुलवली. जायकवाडी व विष्णुपुरी हे दोन्ही प्रकल्प त्यांच्या "जलप्रणेते" असण्याची आजही साक्ष देत आहेत. पुराणात भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणल्याचे दाखले मिळतात; पण डॉ. शंकरराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाण्याचा प्रवाह आणण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले. म्हणूनच त्यांना "आधुनिक भगीरथ" नामाभिदानाने लोकांनी गौरविले.

"पाणी अडवा, पाणी जिरवा" ही त्यांची घोषणा पुढे बोधवाक्ये ठरले. अनेक प्राचीन संस्कृती पाण्याअभावी लोप पावल्या; पण डॉक्टर शंकरराव चव्हाण यांनी जलसंस्कृतीची पायाभरणी केली व ते "जलसंस्कृतीचे जनक" ठरले. तत्कालीन विरोधकांना न जुमानता उभारलेला "नाथसागर" हा त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देत आजहीलोकांची तहान भागवत आजही ताठ मानेने उभा आहे.

दोन्ही वेळा मुख्यमंत्रीपदी विराजमान असताना मला शेतकरी, कष्टकरी, सामान्य लोक यांच्या उद्धारासाठी कसा प्रयत्न करता येईल, हाच विचार त्यांच्या मनात होता. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा या चारही प्रतिनिधी गृहांचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. याही बाबतीत यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवले. सत्ताधीश असल्याच्या मिजाशीत कधी वावरले नाहीत. त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. त्यांच्या आयुष्यात त्यांनी जसा भरभराटीचा व सुखाचा काळ बघितला तसाच खडतर प्रवासही त्यांच्या वाट्याला आला. तोही त्यांनी मनाची शांती ढळू न देता पार केला.

स्वामी रामानंद तीर्थ यांनी बहुजनांच्या हितासाठी सत्ता राबविण्याचा दिलेला कानमंत्र त्यांनी सदोदित पाळला. त्यांनी करड्या शिस्तीचे पालन आयुष्यभर केले व इतरांकडूनही त्याची अपेक्षा केली. कार्यालयात वेळेवर हजर राहणे याबाबत त्यांचा कटाक्ष असे. कामात ढिसाळपणा व दिरंगाई त्यांना आवडत नसे. त्यांच्या कारकिर्दीत प्रशासनास त्यांनी शिस्त लावली. यामुळे त्यांना "हेडमास्तर" असे संबोधले जाऊ लागले. त्याचाही त्यांनी आनंदाने स्वीकार केला. पूर्वी "सचिवालय" म्हणण्याचा शिरस्ता होता, पण त्यांनी तो शब्द बदलून "मंत्रालय" हा शब्द त्यांनी पुढे आणला. त्यांची देशाच्या गृहमंत्री पदाची कारकीर्द विशेष गाजली, ती वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहिली. त्याचप्रमाणे शून्याधारित अर्थसंकल्प सादर करण्याचे श्रेयही त्यांच्याच नावावर जमा आहे. 

केंद्रात काम करत असताना त्यांनी स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, आणि पी. व्ही. नरसिंहराव यांचा सहवास लाभला शिक्षणमंत्री, नियोजनमंत्री, याही पदांवर त्यांनी केंद्रात काम केले. केंद्रात गृहमंत्री पदावर असताना काश्मीर प्रश्न, पंजाबातील अतिरेक्यांचा प्रश्न व आसामचा प्रश्न अतिशय समजूतदार पद्धतीने त्यांनी हाताळला. त्यांच्या कारकिर्दीची कमान आयुष्यभर चढतीच राहिली. 

भ्रष्टाचाराचे निर्मूलन, अधिक कार्यक्षम प्रशासन, दहा लाख टनांहून अधिक धान्योत्पादन की त्यांचीच धोरणे आहेत. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी जसे स्वामी रामानंद तीर्थ यांना आपले गुरु मानले त्याचप्रमाणे गोविंदभाई श्रॉफ यांनाही त्यांनी गुरुत्वाचा दर्जा दिला. डॉ. शंकरराव यांनी आयुष्यभर जपलेल्या  सामाजिक सेवाव्रताशी एकरुप झालेल्या त्यांच्या पत्नी कुसुमताई यांनी प्रत्येक परिस्थितीत त्यांना मोलाची साथ दिली व साहेब मुख्यमंत्री व गृहमंत्री पदी असताना सुद्धा कुसुमताई स्वतः शेतीवाडी कडे जातीने लक्ष देत, त्यांनी डॉक्टर शंकरराव यांना मोलाची साथ दिली.  कुसुमताईंनी आयुष्यातील अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वतःकडे घेतल्या; पण साहेबांच्या राजकीय व्यवस्थेत बाधा येऊ दिली नाही. 

उभयतांनी लोकसेवेचा व कष्टाचा वसा घेतला होता, म्हणूनच त्यांच्या संस्कारात अशोक चव्हाणांसारखे कुशल नेतृत्व उभे राहिले.  

आयुष्यभर लोककल्याणकारी कामांना योग्य न्याय देत डॉ. शंकररावांनी अतिशय कृतार्थपणे व पूर्णत्वाच्या भावनेने या जगाचा निरोप घेतला. त्यांच्यामागे आज त्यांनी केलेल्या असंख्य कामांमधून आपणास त्यांच्या कर्तृत्वाची, निष्कलंकतेची, दूरदृष्टीची व जनसामान्यांविषयीच्या कळवळ्याची पदोपदी साक्षी येते, कदाचित हीच त्यांच्या आयुष्याची कर्तव्यपूर्ती असावी.  त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करताना त्यांच्या हिमालयाएवढ्या कामातून, लोक जाणिवेतून, कष्टाळू प्रवृत्तीतून, निष्कलंक कारकिर्दीतून आपणास आपल्या आयुष्यासाठी काही प्रकाशाचे कवडसे वेचता आले, तरी आपण स्वतःला धन्य समजूया...

"देखणा देहान्त जो,
सागरी सूर्यास्तसा |
अग्नीचा पेरून जातो 
रात्रगर्भी वारसा" ||

लेखक- मुरलीधर हंबर्डे, पाटोदेकर

loading image