Video - किसान ब्रिगेडचा माहूर तहसीलवर मोर्चा 

साजिद खान
Tuesday, 22 December 2020

माहूर येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर व तहसील कचेरीवर शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी मोर्चा धडकला. 

माहूर (जि. नांदेड) : शेतकरी विरोधी असलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पंजाबचे कोट्यावधी शेतकरी आंदोलन करीत आहेत. आतापर्यंत मोदी सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतल्या गेली नाही. चर्चेच्या नावावर शेतकऱ्यांची थट्टा करण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्री करीत असून ऐतिहासिक शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी त्यांचे सर्व हातखंडे वापरून यश मिळत नसल्याने शेतकऱ्यांना खलिस्तानी, पाकिस्तानी संबोधले जात आहे. या आंदोलनाची बदनाम करण्याचा षडयंत्र मोदी सरकारने रचला असल्याची टीका किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी व्यक्त केले. 

सोमवारी (ता.२१) रोजी माहूर येथे किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे, राष्ट्रीय प्रवक्ते पुरुषोत्तम गावंडे, प्रदेशाध्यक्ष अविनाश काकडे, प्रदेश समन्वयक प्रकाश बुटले, लोकशासन आंदोलन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष निरज धुमाळ, संभाजीराव तेटर यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर व तहसील कचेरीवर शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चा धडकला. मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या वेळी प्रदेशाध्यक्ष अविनाश काकडे यांनी आपल्या विशेष शैलीत सरकारच्या शेतकरीविरोधी नीतीचा खरपूस समाचार घेतला. 

हेही वाचाच - नांदेड - बिदर रेल्वे मार्गसाठी जमीन अधिग्रहणासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे निर्देश

ते म्हणाले की, सरकारची आधारभूत किंमत एमएसपी नसून एमपीपी अर्थात मॅक्झिमम परचेस प्राईस असून तुमच्या मालाची किंमत कमी करण्याचा हा कायदा आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी नीतीचे शेतकरी बळी पडतात आणि आत्महत्या करतात. पण कधी कोणाची हत्या करीत नाही. आता अन्याय करणाऱ्या विरुद्ध पेटून उठण्याची गरज आहे. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना मूर्ख समजले असून ‘एक गरीब ब्राह्मण था एक गरीब किसान था’ असे धार्मिक ग्रंथात नमूद करून व्यवस्थेने शेतकऱ्यांना मूर्ख ठरविले असल्याचे सांगून मोदी, शहा, यांच्या शेतकरी विरोधी धोरणावर सडकून टीका केली. 

यावेळी किसान ब्रिगेडच्या नेत्यांची व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव सह लोकशासन आंदोलन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष निरज धुमाळ यांची समायोचीत भाषणे झाली. या सभेला मंचावर मतदार संघातील एकमेव लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अविनाश टनमने यांनी तर संचालन प्रा. प्रवीण बिरादार व आभार नंदू संतान यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Morcha Of Kisan Brigade At Mahur Tehsi Nanded Newsl