मुखेड : नवीन पीक कर्जासाठी बँक अधिकाऱ्यांची मनमानी- शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

प्रल्हाद कांबळे
Friday, 13 November 2020

शाखाधिकारी यांच्या म्हणण्यानुसार "विहीत नमुन्यातील अर्ज भरा, तीन बॉंड पेपर लावा, फेरफार नक्कल लावा, टोच नकाशा लावा, आधार, पॅन, बॅंक पासबुक, दोन फोटो लावा' या सगळ्या अटी शर्ती पूर्ण केल्यानंतर आता फाईल नांदेडला पाठवावी लागेल.

नांदेड : मागील चार महिन्यांपासून नवीन पीक कर्जाच्या फाईल शेतकऱ्यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखा गोजेगाव ता. मुखेड जि. नांदेड या ठिकाणी दाखल केलेल्या असून बॅंकेचे शाखाधिकारी हे वेळोवेळी वेगवेगळे कारण सांगून अक्षरश: शेतकऱ्यांना बॅंकेचे खेटे मारण्यास भाग पाडत आहेत. मुखेड बँक अधिकाऱ्यांच्या मनमानीच्या विरोधात शेतकऱ्यांनी बँकेसमोर ता. २३ नोव्हेंबर रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे. 

शाखाधिकारी यांच्या म्हणण्यानुसार "विहीत नमुन्यातील अर्ज भरा, तीन बॉंड पेपर लावा, फेरफार नक्कल लावा, टोच नकाशा लावा, आधार, पॅन, बॅंक पासबुक, दोन फोटो लावा' या सगळ्या अटी शर्ती पूर्ण केल्यानंतर आता फाईल नांदेडला पाठवावी लागेल. त्याची एआरसीसी करावे लागेल, आता हे नवीन कारण समोर करत आहेत, तेव्हा बॅंक प्रशासन शेतकरी आत्महत्या करण्याची वाट पाहात आहे की काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. 

हेही वाचादेगलूरातील चारशे एकरमध्ये बहरतोय पेरु, सीताफळ

या संदर्भाचे निवेदन मागील ता. २३ आॅक्टोबर रोजी मुख्य प्रबंधक कार्यालयात दिल्यानंतर ता. २७ आॅक्टोबर रोजी मुख्य प्रबंधक अधिकाऱ्यांनी चर्चेस बोलावून तुम्हा नवीन पीककर्ज मागणी धारकांचे कर्ज चार ते पाच दिवसात जमा होईल. आम्ही कार्यालयीन कार्यवाही सुरु केली आहे, असे तोंडी आश्वासन जबाबदार अधिकारी म्हणून दिले होते. परंतु या आदेशास गोजेगाव येथील बॅंकेचे शाखाधिकारी केराची टोपली दाखवण्याचे काम करीत आहेत. आणि कोणत्याही परिस्थितीत जानेवारीपर्यंत तुमचे कर्ज मंजूर होणार नाही, अशी टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत. 

तेव्हा खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम झाला तरी पीककर्ज का मिळेना, यावर्षी अतिवृष्टी पूरसदृष्य परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच आलेले नाही. अक्षरश: उपासमारीची वेळ शेतकऱ्यांवर आलेली असून आतामात्र आमच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम बॅंक करत आह. तेव्हा बालाजी कलेटवाड यांच्यासह आणखी चारजण ता. २० नोव्हेंबर रोजी भारतीय स्टेट बॅंकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर दोन दिवस आमरण उपोषण व ता. २३ नोव्हेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा आज निवेदनाद्वारे मुख्य प्रबंधक, भारतीय स्टेट बॅंक नांदेड आणि जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukhed: Bank official's arbitrariness for new crop loan- Farmers warned of self-immolation nanded news