
नांदेड: ३५ टक्के नागरिकांनीच घेतले लसीचे दोन डोस
नायगाव : प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे नायगाव तालुक्यात लसीकरणाची गती अतिशय मंदावली असून. ७८ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला तर केवळ ३५ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी जोरदार प्रयत्न करत असताना त्यांच्या मदतीसाठी कुठलीच यंत्रणा यायला तयार नाही हे विशेष.
कोरोनावर लस आल्यापासून लसीकरण सुरु झाले. शासनाकडून मोफत लस देण्यात येत असून कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. त्याचबरोबर लसीकरण व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातही करण्यात येत असतांना नागरिकांचा पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही. लसीकरणाच्या सुरुवातीच्या काळात नांदेड जिल्हा राज्यात पहील्या पाच मध्ये असायचा पण सध्या खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे. लसीकरणात नांदेड जिल्हा एवढ्या रसातळाला जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची तर उदासीनता आहेच पण नागरिकांचाही निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.
नायगाव तालुक्यातील १ लाख ६७ हजार ७९६ लोकसंख्येपैकी १ लाख २३ हजार ३३० नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ९५ हजार ६९० नागरिकांनी पहिला डोस घेतल्याने याची सरासरी टक्केवारी ७८ टक्के झाली. तर दुसरीकडे ४३ हजार २६० नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. दुसऱ्या डोसधारकांची टक्केवारी ही केवळ ३५ टक्के होत आहे. तालुक्यातील कहाळा खु. या गावातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने तब्बल १०८ टक्के पहील्या डोसचे उद्दिष्ट साध्य झाले पण दुसऱ्या डोसमध्ये मात्र नागरिकांचा प्रतिसादच मिळाला नसल्याने दुसरा डोस केवळ २९ टक्केच नागरिकांनीच घेतला आहे. तालुक्यातील अनेक गावात पहिला डोस घेण्यासाठी जो प्रतिसाद मिळाला मात्र दुसरा डोस घेण्याबाबत नागरिकांची बेपर्वाई दिसून आली. लसीकरणाबात ग्रामीण भागात आजही गैरसमज असून एकही प्रशासकीय अधिकारी नागरिकांच्या मनातील गैरसमज दुर करण्यासाठी पुढाकार घेतांना दिसून येत नाही. आरोग्य विभागाचेच अधिकारी लसीकरणासाठी प्रयत्न करत आहेत.
"पहील्या टप्प्यातील लसीकरणासाठी लसीचा मुबलक पुरवठा झाला पण मध्यंतरीच्या काळात लसीचा तुटवडा पडला. त्यामुळे नागरिकांनी दुसऱ्या डोससाठी अनेक वेळा चकरा मारुन सुध्दा लस मिळाली नाही. नंतर नागरिकांचीच नकारात्मकता दिसून येत आहे. वारंवार विनंती करुन सुध्दा नागरिक लसीकरणासाठी येण्यास तयार नाहीत."
- डॉ. शेख बालन, तालुका आरोग्य अधिकारी, नायगाव.