
माहूर तालुक्यातील अनमाळ येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी करण रामराव खूपसे(२१) विरूद्ध पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारी वरून भारतीय दंड विधानाच्या बलात्कार,बाल लैंगिक अत्याचार पोस्को सह विविध कलमान्वये माहूर पोलीस ठाण्यात मागील पाच महिन्या पूर्वी (ता.१२) जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वाई बाजार (जि.नांदेड) : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेला २१ वर्षीय आरोपी माहूर पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढल्याची घटना बुधवार (ता. २५) रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. शौचालयात पाणी नसल्याने प्रात विधीसाठी पोलिसांनी त्याला कोठडी बाहेर काढले असता त्याने पळ काढल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे.
माहूर तालुक्यातील अनमाळ येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी करण रामराव खूपसे (वय २१) विरूद्ध पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारी वरून भारतीय दंड विधानाच्या बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार पोस्कोसह विविध कलमान्वये माहूर पोलिस ठाण्यात मागील पाच महिन्यापूर्वी (ता. १२) जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके हे करीत होते. तेव्हापासून कालतागायत आरोपी फरार होता. आरोपीला मंगळवारी (ता. २४) रोजी सहा वाजता माहूर पोलिसांनी अनमाळ येथून अटक केली होती. बुधवार रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार होते. त्यापूर्वीच आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला.
या वेळी ठाणे अमलादार गंगाधर कपाटे, रवी कोंडावार कर्तव्यावर हजर होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या बातमीला दुजोरा दिला. सोबतच तपास अधिकारी यांना आरोपीला अटक केल्यानंतर दक्षता घेण्याचे सूचना वारंवार दिल्यानंतरही सदर प्रकार घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आरोपीविरूद्ध आणखी एक गुन्हा दखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस तीन पथक तयार करून आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र या गंभीर प्रकाराची दखल वरिष्ठांनी घेतली असून लवकरच दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. तपास अधिकारी यांच्या वाढदिवसाचा जल्लोष या घटनेला कारणीभूत असल्याची चर्चा माहूर शहरात केली जात आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे