नांदेड : खूनातील फरार गुन्ह्यातील आरोपीला पोलिस कोठडी

प्रल्हाद कांबळे
Saturday, 6 March 2021

नांदेड शहराला लागूनच असलेल्या हसापुर- नसरतपुर रस्त्यावरील चालणाऱ्या एका जुगारातील पैशाच्या देवाण- घेवाणीवरुन चार जणांनी मिळून महमद वाजीद महमद गौस याचा ता. २६ मे २०२० रोजी मोहमद परवेज व त्याच्या तीन साथिदारांनी खून केला होता.

नांदेड : दोन वर्षापासून नांदेड पोलिसांना गुंगारा देऊन पसार झालेला खून प्रकरणातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता. पाच) सायंकाळी अटक केली. त्याला लिंबगाव पोलिसांच्या स्वाधीन केले असून लिंबगाव पोलिसांनी शनिवारी (ता. सहा) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठवले आहे.

नांदेड शहराला लागूनच असलेल्या हसापुर- नसरतपुर रस्त्यावरील चालणाऱ्या एका जुगारातील पैशाच्या देवाण- घेवाणीवरुन चार जणांनी मिळून महमद वाजीद महमद गौस याचा ता. २६ मे २०२० रोजी मोहमद परवेज व त्याच्या तीन साथिदारांनी खून केला होता. या प्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मोहम्मद परवेज उर्फ छोटू मोहम्मद हा फरार होता. महंमद वाजिद महंमद रा. खडकपुरा याचा मोहम्मद परवेज आणि त्याच्या इतर साथीदारांनी खून केला होता. यापैकी तिघांना यापूर्वीच पोलिसांनी अटक करुन ते सध्या कारागृहात आहेत.

मोहम्मद परवेज हा पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. चंदासिंग कॉर्नर भागात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळताच त्यांनी आपले सहकारी फौजदार प्रवीण राठोड, अमलदार गुंडेराव करले, अफजल पठाण, गंगाधर कदम, राजू शेट्टीकर, संजय जिंकलवाड, देवा चव्हाण, रवी बाबर आणि विठ्ठल शेळके यांच्या पथकाला रवाना केले. या पथकाने गुप्त माहिती काढत मोहम्मद परवेज याच्या मुसक्या आवळल्या. त्याला लिंबगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यानंतर लिंबगाव पोलिसांनी त्याला शनिवारी (ता. सहा) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत पाठवले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Accused in murder case absconding