नांदेड : जि.प.ऑनलाईन स्थायी समितीच्या बैठकीस दांडी मारणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करणार

file photo
file photo

नांदेड- कोरोना महामारीच्या भितीपोटी नांदेड जिल्हा परिषद स्थायी समितीची ऑनलाईन बैठक शुक्रवारी जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या ऑनलाईन बैठकीला अनेक विभाग प्रमुखांनी दांडी मारल्याचे विदारक चित्र पाहताच अध्यक्षा संतापल्या. पूर्व परवानगी न घेता बैठकीला गैरहजर असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांना देवून यापुढे हा सावळा गोंधळ खपवून घेतला जाणार नाही अशी तंबीच अध्यक्षांनी दिली.

नांदेड जिल्हा परिषदेत शुक्रवार ता. 4 डिसेंबर रोजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन स्थायी समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपाध्यक्षा पद्मारेड्डी सतपलवार, शिक्षण सभापती संजय बेळगे, सुशिला बेटमोगरेकर, बाळासाहेब रावणगावकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

ऑनलाईन सभेला सुरुवात झाल्यानंतर कालच दिव्यांगांनी जिल्हा परिषदेवर काढलेल्या मोर्चाचा विषय चर्चेला आला. या दिव्यांगांच्या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यास समाजकल्याण विभागाचे अधिकारी चालढकल करीत असल्याचा आरोप करण्यात आला. या संदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी विभागनिहाय अधिकार्‍यांना ऑनलाईनवर येण्याचे फर्मान अध्यक्षांनी सोडले. ऑनलाईन सभेला अनेक विभाग प्रमुखांनी दांडी मारल्याचे विदारक चित्र समोर येताच अध्यक्षा भलत्याच संतप्त झाल्या होत्या. यापुढे प्रशासनाचा असा गलथानपणा खपवून घेतला जाणार नाही. विनापरवानगी बैठकीस गैरहजर राहणार्‍या अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य कार्यकारि अधिकार्‍यांना दिले.

जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून या वर्गखोल्या बांधण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे जलजीवन मिशन अंतर्गत चालु असणारी कामे तातडीने पूर्ण करा अशा सूचनाही या बैठकीदरम्यान देण्यात आल्याचे सांगण्यात आले. या बैठकीला समिती सदस्यांनी ऑनलाईन हजेरी लावली होती. 

 सोलापूर जिल्हा परिषदेचे जगात अव्वल ठरलेले शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या अभिनंदनाचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. आगामी काळात शिक्षक रणजितसिंह डिसल यांचा नांदेड येथे यथोचित सत्त्कार सोहळा घेण्याबाबतीत चर्चा करण्यात आली. तसेच दिव्यांग बांधवांचा 5 टक्के राखीव निधी, अनुकंपाधारकांची नियुक्ती यावरून अध्यक्षांनी विभागप्रमुखांना खडेबोल सुनावल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रीय लाल खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीमेत राज्यात 7 व्या क्रमांकावर आलेल्या जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांचे अभिनंदनही करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com