नांदेड : दिवाळीनंतर शहरात घरोघरी तुळसी विवाहाला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


नांदेड : दिवाळीनंतर शहरात घरोघरी तुळसी विवाहाला सुरुवात

नांदेड : दिवाळीनंतर शहरात घरोघरी तुळसी विवाहाला सुरुवात

नांदेड ः कार्तिक शुद्ध द्वादशीच्या मुहूर्तावर तुळसी विवाहाला सोमवारी (ता.१५) सुरुवात झाली आहे. कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या काळात तुळसीचा विवाह लावण्याची परंपरा आहे. अगदी घरच्या विवाह समारंभाप्रमाणेच अंगणातील तुळशीचा विवाह केला जातो. त्यानंतर लग्नाच्या मुहुर्तांना सुरुवात होत असते.

तुळसी विवाहाच्या तयारीसाठी सोमवारपासून घरोघरी लगबग सुरू झाली असून पूजा आणि लग्नविधी, साहित्य खरेदीसाठी नागरिकांची धांदल उडत आहे. तुलसी विवाहानंतर लग्नसराईस प्रारंभ होणार असल्याने विवाह इच्छुकही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे सावट घोंघावत असल्याने जवळचाच मुहूर्त साधण्याकडे वधु-वरांसह पालकांचा कल वाढला आहे.

मांगल्याचे प्रतीक मानली जाणारी तुळस प्रत्येक घराच्या अंगणात मानाने डोलत असते. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे. पाच दिवसांमध्ये प्रत्येकाच्या सवडीनुसार आपापल्या तुळशींचे विवाह सोहळे पार पाडले जातात. त्यामुळे घरोघरी आता तुळसी विवाह सोहळ्याच्या तयारीसाठी लगबग सुरू झाली आहे. तुलसी विवाहानिमित्त घरोघरी तुळशी वृंदावनाची रंगरंगोटी करण्यात येत आहे. तुळशीच्या लग्न सोहळ्यासाठी लागणारे ऊस, चिंच, आवळा, बोरे, झेंडूची फुले व हिरव्या बांगड्या, काळे मणी तसेच विवाहाच्या अन्य पूजा साहित्याची बाजारपेठेत रेलचेल वाढली आहे. नांदेड शहरात जुना मोंढा, छत्रपती चौक, तरोडा नाका, कलामंदिर, वजिराबाद, नवा मोंढा, आनंदनगर आदी ठिकाणी तुलसी विवाह साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत.

हेही वाचा: दिल्लीत लॉकडाऊनची तयारी, 'आप' सरकारची कोर्टात माहिती

अंगणाला टेरेसचा पर्याय...

पूर्वी ग्रामीण संस्कृतीमध्ये घराच्या अंगणात तुळसी वृंदावन व त्यामध्ये तुळस डोलत असायची. परंतु बदलत्या जीवनशैलीमध्ये फ्लॅट संस्कृतीच्या अतिक्रमणामुळे अंगण लुप्त झाले आहे. त्यामुळे अंगणाला पर्याय म्हणून टेरेसचा वापर केला जात आहे. फ्लॅटधारक एकत्रित येत इमारतीच्या छतावर सामुहिक तुलसी विवाह सोहळे पारंपारिक पद्धतीने पार पाडताना दिसत आहेत.

loading image
go to top