नांदेड : मागासवर्गीयासाठी राज्यात आंध्रप्रदेशच्या धर्तीवर नवीन कायदा होणार- चंद्रकांत हंडोरे 

प्रल्हाद कांबळे
Friday, 25 December 2020

आंध्रप्रदेशच्या धर्तीवर नविन कायदा करण्यात यावा व त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री तथा मुंबई कांग्रेसचे प्रभारी चंद्रकांत हंडोरे यांनी नांदेड येथे दिली. 

नांदेड : राज्यातील मागासवर्गीयांसाठी शासनाकडून देण्यात येणारा निधी इतरत्र वळविल्या जात आहे. हा निधी सामाजीक न्याय विभागाकडून वळविल्या जाऊ नये, यासाठी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर नविन कायदा करण्यात यावा व त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री तथा मुंबई कांग्रेसचे प्रभारी चंद्रकांत हंडोरे यांनी नांदेड येथे दिली. 

माजी मंत्री हंडोरे हे गुरुवारी (ता. २४) नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असता ते बोलत होते. यावेळी आमदार मोहण हंबर्डे, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष सुरेश हटकर, जिल्हाध्यक्ष शत्रुग्न वाघमारे, शहराध्यक्ष संजय कवठेकर, पप्पू कुर्तडीकर, लातूरचे मोहन माने, गंगाधर सोनकांबळे, आकाश कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना हंडोरे म्हणाले की, माझ्या मंत्रीपदाच्या काळात उपेक्षितांना न्याय मिळावा या सामाजिक भावनेने मोठे निर्णय घेतले. मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी अनेक योजना निर्माण केल्या. परंतू ह्या सर्व योजना सद्यस्थितीला ठप्प आहेत. तसेच यासाठी मोठ्या प्रमाणात असलेला निधी इतरत्र वळविल्या जात आहे. याबाबत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी या बाबीची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लेखी पत्र दिले आहे. 

हेही वाचाचांगली बातमी : लोहा येथील बालिकेचा बालविवाह रोखला- जिल्हा बाल संरक्षण कक्षाची तत्परता -

मागील नऊ ते १० वर्षाच्या काळात सरकारने मागासवर्गीयांच्या योजनांचा खेळखंडोबा केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मागील १० वर्षाच्या काळात सामाजीक न्याय विभागाचा १३० हजार कोटीचा निधी इतर खात्यांना देत गोरगरीबांसाठी असलेल्या योजना शासकीय यंत्रणेने ठप्प केल्या आहेत. या योजनांचा निधी इतरत्र वळविता येऊ नये यासाठी अंध्रप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात कायदा करणार आहोत. नव्याने करण्यात येणाऱ्या कायद्याचा ड्राप तयार असून तो लवकरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करणार असून हा कायदा तयार व्हावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

मुबंई महानगरपालीका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा नुतन अध्यक्ष भाई जगताप यांनी केलेल्या वक्तव्याचे त्यांनी समर्थन करत भाई जगताप यांची भुमिका योग्य असल्याचेही यावेळी सांगीतले. जिल्ह्यातील बिलोली येथील मुकबधिर तरुणीवर झालेला अत्याचार व खुन प्रकरण ही गंभीर बाब असून खरे आरोपी शोधून त्यांना तत्काळ शिक्षा व्हावी यासाठी पोलिस अधिक्षक यांच्याशी चर्चा केली असल्याचे हंडोरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Andhra Pradesh-style new law for backward classes in the state Chandrakant Handore nanded news