नांदेड : नाळेश्वरमध्ये जनावरांची आरोग्य तपासणी

प्रल्हाद कांबळे
Monday, 7 September 2020

नाळेश्वर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातंर्गत नाळेश्वरसह रहाटी, जैतापुर, सोमेश्वर, पिंपळगाव कोरका, ढोकी आदी गावांचा समावेश आहे. सध्या जिल्हाभरातील पशुधनांमध्ये लम्पी स्किन डिसीज या संसर्गजन्य रोगाची साथ पसरली आहे.

नांदेड :  जिल्ह्यात जनावरांना लम्पी स्किन डिसीज या संसर्गजन्य रोगाचा प्रादूर्भाव होत आहे. या पाश्र्वभूमीवर  नांदेड तालुक्यातील नाळेश्वर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांची आरोग्य तपासणी करण्यात आली.  पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी खरवडकर यांनी आजारी जनावरांवर उपचार केले.

नाळेश्वर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातंर्गत नाळेश्वरसह रहाटी, जैतापुर, सोमेश्वर, पिंपळगाव कोरका, ढोकी आदी गावांचा समावेश आहे. सध्या जिल्हाभरातील पशुधनांमध्ये लम्पी स्किन डिसीज या संसर्गजन्य रोगाची साथ पसरली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी खरवडकर यांनी जनावरांच्या आरोग्याची तपासणी करुन आजारी जनावरांवर औषध उपचार केले. लम्पी स्किन डिसीज हा रोग गाय, बैल, वासरु यास होतो. म्हशीमध्ये  या रोगाचे प्रमाण नगन्य असते. 

पशुवैद्यकीय दवाखान्यात १०० जनावरांच्या आरोग्याची तपासणी 

या रोगाच्या संसर्गापासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा, डासांपासून जनावरांचा बचाव करावा, असे डॉ.सौ.खरवडकर यांनी सांगितले. लम्पी या आजाराची लागन झालेल्या जनावरांवर तीन दिवस औषध उपचार केले जातात. बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून दूर ठेवणे आवश्यक असते, असेही त्यांनी सांगितले. नाळेश्वर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात १०० जनावरांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली असून पट्टीबंधक शेख मकसुद शेख हैदर यांनी तपासणी कामात सहकार्य केले. 

हेही वाचा -  शेतकऱ्यांसाठी खुशखबर...नांदेडला यंदा रब्बीचा हंगाम चांगला!

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांना आदरांजली

नांदेड- शिवा संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे  यांच्या आवाहनानुसार नांदेड येथे नवीन मोंढा येथील ब्रिलीयंट अक्याडमी या ठिकाणी शिवैक्य राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी सर्व मान्यवरांनी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जिवनचरित्र्यावर मनोगते व्यक्त केली. 

शिवा संघटनेकडुन राष्ट्रसंत उपाधी देण्यात आली
 
डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी तमाम मानवजातीच्या कल्याणासाठी व वीरशैव- लिंगायतांच्या धर्म जाग्रतीसाठी आयुष्य वेचले असे मत प्रतिपादन राज्यसरचिटनीस विठ्ठलराव ताकबीडे यांनी केले. तर शिवा कर्मचारी महासंघाचे मराठवाडा प्रमुख संजय कोठाळे यांनी आप्पांच्या जीवनचरित्र्यावर बोलताना आदरणीय गुरुवर्यांना सन. २००७ या वर्षी शिवा संघटनेकडुन राष्ट्रसंत उपाधी देण्यात आल्याचे सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड जि. प. बांधकाम सभापती संजय बेळगे, जिल्हासंपर्कप्रमुख ईंजि. अनिल माळगे, डॉ. दत्तात्रय मठपती, प्रा. कोंडे, जिल्हाध्यक्ष संभाजी पा. बुड्डे, शंकर आण्णा पत्रे, कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष विरभद्र बसापुरे, महीला आघाडी जिल्हाध्यक्षा नंदा पाटील, शहरप्रमुख शिवराज उमाटे, विजय हिमगीरे व जिल्ह्यातील अनेकांची उपस्थिती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Animal health check-up at Naleshwar nanded news