नांदेड : अर्धापूरच्या शेतकऱ्याने लाॅकडाऊनमध्ये शेती केली अॅनलाॅक, टमाटे, वांग्याचे आणले जोमदार उत्पन्न

file photo
file photo

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच उद्योग धंद्याला टाळेबंद असताना शेती उद्योग मात्र खंबीरपणे उभा राहिला. जसे डाॅक्टर, पोलिस, स्वच्छता कर्मचारी कोरोना योध्दे होते अगदी त्याचप्रमाणे शेतकरीसुध्दा हे देखील योध्याप्रमाणे लढून काळ्या आईची सेवा करण्यात मग्न होते. शहरातील तरुण शेतकरी सुमेध देशमुख यांनी वांगे व टमाटा पिकाचे योग्य नियोजन लावून कमी अवधीमध्ये तीन एकर शेतीत उत्पन्न काढून संकटाला संधीत रूपांतर केले आहे. सध्या दोन्ही फळभाज्यांना चांगली मागणी व भाव मिळत असल्यामुळे चांगले उत्पन्न निघत आहे. 

शेतकरी अनेक अडचणी व संकटावर मात करुन निसर्गाशी दोन हात करित आहेत. यंदाच्या खरिप हंगाम कोरोनाच्या सावटा खाली गेला. केळी, कापूस, सोयाबीन या पिकाला लागलेला लागवडी खर्च ही निघाला नाही. जो शेत माल उत्पादित झाला त्याला भाव मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतक-यांनी पर्यायी पिके घेतली. यात प्रामुख्याने भाजीपाला पिके जास्त होती.

शहरातील तरुण शेतकरी सुमेध देशमुख यांनी आपले शेतकरी वडील आर. आर. देशमुख यांच्या शेतीतील अनुभवाचा उपयोग करुन पारंपरिक शेती पिके घेत यंदा भाजीपाला पिके घेण्याचा निर्णय घेतला. लाॅकडाऊनच्या काळात घरी न बसता योग्य ती काळजी घेवून मे, जुनमध्ये शेतीची मशागत करून घेतली. शहरापासून मोठी शहरे व भाजीपाल्याची बाजारपेठ जवळ असल्यामुळे फळभाजी घेण्याचा निर्णय घेतला.

भाजीपाला पिके घेण्यासठी बाजारपेठ, मागणीचा काळ व मिळणारा भाव लक्षात घेवून सुमेध देशमुख यांनी वांगी व टमाटे लावण्याचा निर्णय घेतला. त्यांना जुनमध्ये दोन एकर टमाटे व एक एकर वांगी लावली. या दोन्ही पिकाचे रोपे तयार करुन पाच बाय दोनच्या अंतराने गादी वाफ्यावर रोपांची लागवड केली. रोपांना समान व समतोल पाणी मिळावे यासाठी ठिबकव्दारे पाणी देण्यात आले. तसेच खतांची मात्रा योग्य प्रमाणात मिळावी यासाठी द्रव्य स्वरुपात खते ठिबकव्दारे देण्यात आले. तसेच किड व रोग नियंत्रणासाठी किटक नाशकांची फवारणी करण्यात आली. पिकात हवा खेळीत रहावी यासाठी दोन वाफ्यात योग्य ते अंतर ठेवून पुर्व- पश्चिम अशी लागवड केली. टमाट्याच्या वाढीसाठी ताराचा मंडप करुन दोरीच्या साह्याने रोपे बांधल्यामुळे तीन ते चार फुट वाढ झाल्याने फळधारणा खुप मोठ्या संख्येने झाली आहे. सध्या प्रत्येक झाड टमाट्यांनी लगडून गेले आहे.

पिकाच्या लागवडीपासून पाणी, खते, किटक नाशक, किड नियंत्रण यांचे योग्य नियोजन लावल्यामुळे चौथ्या महिण्यात वांगी व टमाटे काढण्यासाठी आले आहेत. सध्या दोन्ही भाज्यांना चांगला भाव मिळत आहे. काढण्यासाठी दररोज दहा महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. उत्पादित झालेले टमाटे, वांगी स्थानिक बाजारपेठेत पाठविले जात आहेत.

पारंपरिक शेतीसोबत यंदा भाजीपाला पिके घेण्याचा निर्णय घेतला. जुनमध्ये वांगी व टमाट्याची लागवड करण्यात आली. सध्या काढणीला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत पाचशे कॅरेट टमाटे व तिनशे कॅरेट वांगी काढण्यात आली आहेत. टमाट्याला प्रती कॅरेट सरासरी तिनशे तर वांग्यालाही तिनशे भाव मिळत असे. दोन्हींची योग्य ती प्रतवारी करुन गुणवत्तापुर्ण माल वसमत, नांदेड, उमरखेड आदी बाजारपेठत विकण्यात येत आहे. 

संपादन - प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com