Nanded : अर्धापुरात भारत जोडो यात्रेची लगीनघाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागरिकांची जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Nanded : अर्धापुरात भारत जोडो यात्रेची लगीनघाई

अर्धापूर : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली भारत जोडो यात्रेचे अभुतपूर्व प्रतिसादानंतर त्यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात असलेल्या अर्धापूर तालुक्यात गुरूवारी (ता.दहा) रात्री उशिरा आगमन होणार आहे. यात्रेचे भव्य दिव्य स्वागत करण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.

शहरासह तालुक्यात तयारीची लगीन घाई सुरू झाली असून मुंबई, परभणी, मराठवाड्यातील पदाधिकारी शहरात दाखल झाले आहेत. तालुक्यात जागा मिळेल तिथे बॅनर लावले आहेत. परभणी, नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी बॅनर लावण्यात आघाडीवर आहेत. शहरात हदगाव, किनवट मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते अर्धापूर तालुक्यातुन यात्रेत सहभागी होणार आहेत. अर्धापूर तालुका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात येत असल्याने एक विशेष जबाबदारी व महत्त्व यात्रेच्या निमित्ताने आले आहे. ही जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत असून या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष विशेष प्रयत्न करित आहेत. यात हादगावचे आनंद भंडारे, किनवटचे सुर्यकांत रेड्डी, माहुरचे संजय राठोड, हिमायतनगचे विकास पाटील देवसरकर यांचा समावेश आहे.

भारत जोडो यात्रा लोकचळवळ झाली असून जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात भव्य दिव्य आसे स्वागत करण्यात येईल अशी माहिती जिल्हा अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी दिली. भोकर विधानसभा मतदारसंघात अभुतपुर्व असे स्वागत होईल अशी माहीती संजय देशमुख लहानकर यांनी दिली. अर्धापूर तालुक्यातुन २५ हजार नागरिक सहभागी होणार असल्याचे बालाजी गव्हाणे यांनी सांगितले. मुदखेड तालुक्यात चैतन्याचे वातावरण असल्याचे शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, उध्वराव पवार व जगदीश पाटील यांनी सांगितले.

तीस हजार यात्रेकरूंसाठी जेवणाची व्यवस्था

भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने आर्धापुरात येणाऱ्या नागरिकांची व्यवस्था करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यात्रेत सहभागी झालेले नागरिकांची जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यात्रेत सहभागी झालेल्या तीस हजार नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असून बुंदी तयार करण्यात येत आहे. जेवनात वरण भात, पोळी, बुंदी, भाजी असे पदार्थ राहणार आहेत.