
नांदेड : आसनाच्या पुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
नांदेड - मागील दोन - तीन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. नांदेडपासून जवळच असलेल्या आसना नदीला पूर आल्यामुळे नदीचे पाणी आसपासच्या गावांसह शेतामध्ये शिरल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतमजुरांच्या घरामध्ये थेट पाणी घुसून त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंचे, अन्नधान्याचे, गोठ्यामध्ये बांधून ठेवलेल्या जनावरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. महाराष्ट्रात सत्तांतरानंतर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे पॅकेज द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली आहे.
नांदेड उत्तर मतदार संघातील आसना नदीकाठी असलेल्या अनेक गावांना मुसळधार पावसाने झोडपल्यामुळे आसना नदीला पूर आला आहे. नदीच्या लगत असणाऱ्या पासदगाव, निळा, चिखली, खुरगाव, आलेगाव, मरळक, नेरली, जैतापूर, सोमेश्वर अशा अनेक गावातील शेतकऱ्यांना पुरांचा फटका बसला असून शेतकरी वर्गाचे, शेतमजुरांचे, शेतीचे व पिकांचे नुकसान झाले आहे.
प्रशासनाने दखल घेऊन सदरील शेतकऱ्यांच्या पुरामुळे झालेल्या शेतीचे व पिकांचे आर्थिक नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख यांनी केली आहे. गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. यावेळी देशमुख यांच्यासमवेत किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबुराव शिंदे, तालुकाध्यक्ष आनंद पावडे, संतोष क्षीरसागर, सुनील राणे, गंगाधर जाधव, बालाजीराव कदम, सुग्रीव कदम, जगनाथ कदम आदी उपस्थित होते.
Web Title: Nanded Asana River Flood Farmers Agriculture Loss Provide Financial Help Bjp Demand
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..