नांदेड : महावितरणच्या तंत्रज्ञास मारहाण, लिंबगाव ठाण्यात गुन्हा  

प्रल्हाद कांबळे
Friday, 7 August 2020


राहीत्र दुरूस्त करून वीजपुरवठा पुर्ववत करत असताना निळा (ता. नांदेड) येथे महावितरणच्या तंत्रज्ञास मारहाण

नांदेड : कोरोनाच्या सावटातही वीजपुरवठा अखंडीतपणे सुरू रहावा यासाठी महावितरणचे कोरोना यौध्दे रात्रंदिवस काम करत आहेत. मात्र अशा प्रसंगीही सहकार्य करण्याच्या ऐवजी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात येत आहे. निळा (ता. नांदेड) गावातील नादुरूस्त रोहीत्र दुरूस्त करून वीजपुरवठा पुर्ववत करत असताना तंत्रज्ञ राजेश वाघमारे यांना वीजग्राहक चांदू दिगंबर कदम व लखन रामा कंधारे यांनी डीपी फोडण्याचा प्रयत्न करत शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवार (ता. पाच) ऑगस्ट रोजी निळा ते आलेगाव रस्त्यावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ नादुरूस्त झालेले दोन रोहीत्र दुरूस्त करून रात्री ११ वाजता गावातील वीजपुरवठा पुर्ववत करत असताना तेथे येवून लाईट ताबडतोब का सुरू केली नाहीस. असे म्हणत शिवीगाळ करत डीपीवर दगड फेकण्यास सुरवात केली. डीपी फुटेल, दगड मारू नका असे सांगताच चांदु दिगंबर कदम याने गळा दाबत बेल्टने मारण्यास सुरवात केली. तर सोबतच्या लखन कंधारे याने तोंडावर थापडा  मारत तुझे हातपाय तोडून टाकतो असे म्हणत शिविगाळ करत जबर मारहाण केली. प्राथमिक उपचार घेण्यासाठी निळा येथील दवाखान्यात रात्री साडेअकरा वाजता उपचार घेत असताना दवाखान्यात येवून कदम व कंधारे यानी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा - नांदेड : खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागन

विजग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे

झाल्या प्रकाराबाबत लिंबगाव पोलीस ठाण्यात राजेश वाघमारे यांनी तक्रार दिली. यांच्या तक्रारीवरुन मारहाण करणाऱ्या चांदु दिगंबर कदम व लखन रामा कंधारे याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याबाबत गुरुवार (ता. सहा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश गोटके करत आहेत. वाढत्या मारहाणीच्या घटनांमुळे महावितरणच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अशा घटना होउ नये यासाठी विजग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन करण्‍यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Assault on MSEDCL technician, crime in Limbgaon police station nanded news