दूर्दैवी घटना : बैलगाडीसह सालगडी वाहून गेला, सुदैवाने तो वाचला मात्र...

अमोल जोगदंड
Friday, 18 September 2020

उमरी (ता. अर्धापूर) येथील शेतकरी संगमनाथ गवळी यांच्या शेतातील जनावरांसाठी चारा आणण्यासाठी सकाळी  सातच्या दरम्यान त्यांचा सालगडी भानुप्रसाद दरणे (वय ४५) हे शेताकडे बैलगाडी घेऊन निघाले.

मालेगाव (जिल्हा नांदेड) : अचानक आलेल्या पुरात बैलगाडीसह सालगडी वाहून गेला. मात्र या घटनेत सालगड्याला पोहता येत असल्याने तो वाचला. मात्र दोन्ही बैल मृत्यूमुखी पडले. ही घटना शुक्रवारी (ता. १८) सकाळी उमरी (ता. अर्धापूर) शिवारात घडली. यात शेतकऱ्याचे जवळपास एक लाखाचे नुकसान झाले. 

उमरी (ता. अर्धापूर) येथील शेतकरी संगमनाथ गवळी यांच्या शेतातील जनावरांसाठी चारा आणण्यासाठी सकाळी  सातच्या दरम्यान त्यांचा सालगडी भानुप्रसाद दरणे (वय ४५) हे शेताकडे बैलगाडी घेऊन निघाले. शेताकडे जाताना रस्त्यावरील एका मोठ्या नाल्याला रात्रभर पडलेल्या पावसाने मोठा पूर आला होता. या पुराचे पाणी वेगात वाहत असल्याचे सालगड्याच्या लक्षात आले नाही. त्यांनी आपली बैलगाडी या नाल्यातून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहत्या पाण्यात बैलगाडीसह सालगडीही वाहून गेला होता. 

हेही वाचाप्रमोद शेवाळे नांदेडचे नवे पोलीस अधीक्षक, विजयकुमार मगर यांची बदली

दोन्ही बैलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू 

मात्र सालगडी भानुप्रसाद दरणे यांना पोहता येत असल्याने त्यांनी कसाबसा स्वतः चा जीव वाचवला पण दोन्ही बैलांना जीव वाचवु शकला नाही. वाहून गेलेला एक बैल पुलापासून काही अंतरावर गावकऱ्यांना सापडला. तर दुसरा बैल परिसरातील गणपुर (ता. अर्धापूर) परिसरात मृतावस्थेत सापडला. सालगड्याच्या एका चुकीमुळे शेतकऱ्याचे तरणेबांड दोन बैल वाहून गेले. शेतकरी श्री. गवळी यांचे जवळपास एक लाखाचे नुकसान झाले. 

ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा 

सदर घटनेची माहिती मिळताच अर्धापूर तहसिल कार्यालयाचे मंडळाधिकारी प्रफुल खंडागळे, तलाठी लक्ष्मण देशमुख, पशुवैद्यकीय अधिकारी विवेकानंद पोलावाड आणि पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा केला. यावेळी या दुर्दैवी घटनेमुळे शेतकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. बैलाविषयी हळहळ व्यक्त होत आहे. 

येथे क्लिक करा - Video- हिंगोली : कुरुंदा येथ़ील नदीला पूर, अनेक घरात पाणी शिरले

फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान 

मालेगाव परिसरात मागील आठवडाभरापासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने परिसरातील विहिरी, तलाव, नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यातच शेतातील उभी असलेली पिके उध्वस्त झाली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीनला मोड आलेले आहेत तर वादळी वाऱ्यामुळे ऊस भुईसपाट झाला आहे. या पावसामुळे फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded bad news: farmer was carried away with a bullock cart, fortunately he survived but nanded news