नांदेड : कोट्यावधी रुपयांची शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याचा जामीनअर्ज नाकारला 

प्रल्हाद कांबळे
Tuesday, 2 February 2021

ऑक्टोबर 2020 मध्ये सुरेश सुदाम जाधव राहणार वांगी तालुका नांदेड यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुक प्रकरणी तक्रार दिली होती.

नांदेड : शेतकऱ्यांची फसवणूक करुन अटकेत असलेल्या तीन जणांपैकी एकाला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. डी. खोसे यांनी जामीन नाकारला आहे. सोबतच अटकेत असलेल्या दोघांना मात्र जामीन दिला आहे.

ऑक्टोबर 2020 मध्ये सुरेश सुदाम जाधव राहणार वांगी तालुका नांदेड यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुक प्रकरणी तक्रार दिली होती. त्यांनी आणि इतर शेतकऱ्यांनी मिळून वाजेगाव (ता. नांदेड) येथील शिवम ट्रेडर्सकडे आपल्या शेतातील सोयाबीन व अन्य धान्य विक्री केले होते. त्याची रोख रक्कम न देता त्यात अजून दर वाढणार आहेत असे सांगून शिवम ट्रेडर्स मालकांनी शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. मात्र दर वाढलेच नाही त्याउलट शिवम ट्रेडर्सला ताळे ठोकून दुकानदार पसार झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी तक्रार दिली. यामध्ये एकूण 93 लाख 42 हजार 448 रुपयांची शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा उल्लेख आहे. यानंतर नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्यात दिगंबर माधव काचावार, अंकुश दत्तात्रय काचावार, बालाजी बळीराम उपलेंचवार, दत्तात्रय माधव काचावार आणि अक्षय दत्तात्रय काचावार यांच्यावर फसवणुकीसह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी दिगंबर माधव काचावार, अंकुश दत्तात्रय काचावार आणि बालाजी बळीराम उपलेंचवार या तिघांना अटक केली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर ते सध्या न्यायालयीन कोठडीत होते. त्यांनी जामीन मिळावा म्हणूनफौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक 904 \2020 दाखल करुन जिल्हा न्यायालयात जामीन मागण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या सेमध्ये एकूण 28 शेतकऱ्यांकडून एक कोटी आठ लाख पाच हजार 618 रुपयांचा शेतमाल खरेदी करुन त्यांची फसवणूक केल्याचे नमुद केले आहे. सोबतच कोहिनूर सीड्स अँड लिमिटेड, साईस्मरण, शिवा ट्रेडिंग कंपनी यांच्यात पैशाचे व्यवहार झाले आहेत असेही नमुद केले. त्यामुळे आरोपींना जामीन देऊ नये अशी विनंती केली. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. रणजित देशमुख यांनी बाजू मांडली. यानंतर न्यायाधीश खोसे यांनी आपला तेरा पानी निकाल दिला. त्यात बालाजी बळीराम उपलेंचवार याचा या गुन्ह्यात सहभाग दिसतो अशी नोंद केली आणि जामीन अर्ज क्रमांक 904 काही अंशी मंजूर केला. त्यात अर्जदार आरोपी बालाजी बळीराम उपलेंचवार यांना जामीन नामंजूर केला. मात्र अंकुश दत्तात्रेय काचावार यांना डामीन दिला. तसेच दिगंबर माधव काचावार यांना जामीन मंजूर केला. या दोघांनी पोलिस ज्यावेळी बोलावतील त्यावेळी तपासीक अंमलदारासमोर हजर राहावे आणि त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करु नये अशा अटी त्यांच्यावर लादल्यानंतरच जामिन दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Bail plea of crores of rupees defrauded farmers rejected nanded judicial news