नांदेड : सावधान मुखेड तालुक्यातील ‘हा’ तलाव फुटण्याची शक्यता बळावली...!

विनाोद आपटे
Thursday, 17 September 2020

तलावाच्या पाळूवरून पाणी वाहत आहे...! कोट्ग्याळ व गोजेगाव येथील नागरिकांचा जीव लागला टांगणीला...!

मुक्रमाबाद (जिल्हा नांदेड) : मागील आठवड्यात मुक्रमाबाद परीसरात सतत पाऊस पडत असल्यामुळे कोटग्याळ येथील पाझर तलाव हा क्षमतेपेक्षा जास्त भरला असून तलावाच्या तटभिंती वरून पाणी वाहत आहे. तलावाच्या तटभिंतीला मोठा धोका निर्माण झाला असून पाण्याच्या तिव्र प्रवाहामुळे ही तटभिंत कोणत्याही क्षणी जमिनदोस्त होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता अधिक बळावल्यामुळे कोट्ग्याळ व गोजेगाव येथील नागरिकांच्या जीव टांगणीला लागला आहे. मात्र प्रशासन अजूनही कुंभकर्णी झोपेत असल्याने मोठी घटना घडण्याची वाट पाहत आहे की काय असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करत आहेत.

मुखेड तालुक्यातील आडमार्गावर असलेल्या कोट्ग्याळ येथे नागरिकांची पाण्याची सोय व्हावी ही, महत्वकांक्षा ठेऊन प्रशासनाने याठिकाणी पाझर तलावाची १९७२ मध्ये निर्मिती केली. कालांतराने या पाझर तलावावरील प्रशासनाचे असलेले लक्ष कमी झाल्यामुळे हा तलाव गाळ, दगड व झाडाझुडपांनी मोठ्या प्रमाणात व्यापल्यामुळे या तलावात पाण्याची आवक क्षमतेपेक्षा जास्त असल्यामुळे हा तलाव तुंडूंब भरला आहे. पाण्याला वाट दिसेल तिकडे निघून जात आहे. 

हेही वाचा - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची गरुडभरारी

हा तलाव कोणत्याही क्षणी फुटण्याची दाट शक्यता 

गेल्या चार दिवसापासून परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे तलावात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात चालू आहे. प्रशासनाकडून देखभाल नसल्यामुळे हा तलाव कमकुवत झाला आहे. पाण्याची आवक जास्त असल्यामुळे तलावाच्या तटभिंतीवरून पाणी वाहत असून पाण्याच्या या तिव्र प्रवाहामुळे तलावाच्या तटभिंतीला भगदाड पडत असल्यामुळे हा तलाव कोणत्याही क्षणी फुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली. कोट्ग्याळ व गोजेगाव येथील नागरिकांचा जीव टांगणीला लागला असून नागरिक राञ जागून काढत असतानाही प्रशासन अजून गाढ झोपेत आहे.

नागरिकांचा जीव धोक्यात आला 

संबंधित प्रशासनाचा अधिकारी व कर्मचारी भेट देऊन तलावात साठलेले अतिरिक्त पाणी काढून डागडूजी व्यवस्थित केली असती तर तलाव, गोजेगाव व कोट्ग्याळ येथील नागरिक व सहभोवताली असलेली शेतीही सुरक्षित राहीली असती. पण अद्यापपर्यत याठिकाणी संबंधित प्रशासनाचा अधिकारी व कर्मचारी पोहचाला नाही हे विशेष.  प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Beware, the possibility of bursting of 'this' lake in Mukhed taluka has increased nanded news