esakal | नांदेड- बिदर मार्गाचा निर्माण अहवाल प्राप्त, निधी मंजुरीची प्रतिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

track 1

देशभरातील विविध झोनमधील काही नवीन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहेत. यामध्ये देशातील दहा तर आपल्या भागातील नांदेड आणि बिदर ही दोन प्रमुख प्रार्थनास्थळे जोडणाऱ्या आणि दोन राज्य एकमेकांशी जोडल्या जाणाऱ्या या रेल्वेमार्गाला दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या सिकंदराबाद विभागाने हिरवा कंदिल दाखविला आहे. त्याचा अंतिम सर्वेक्षण अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे नांदेड-बिदर रेल्वे मार्ग लवकर पुर्ण होण्यासाठी आता निधीची आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज निर्माण झाली आहे.  

नांदेड- बिदर मार्गाचा निर्माण अहवाल प्राप्त, निधी मंजुरीची प्रतिक्षा

sakal_logo
By
राजन मंगरुळकर

नांदेड ः नांदेड आणि बिदर ही दोन प्रमुख प्रार्थनास्थळे जोडणाऱ्या आणि महाराष्ट्र, कर्नाटक ही राज्ये एकमेकांशी जोडल्या जाणाऱ्या नांदेड-बिदर या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षण अहवालाला दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या सिकंदराबाद विभागाने हिरवा कंदिल दाखविला आहे. त्याचा अंतिम सर्वेक्षण अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे नांदेड-बिदर रेल्वे मार्ग लवकर पुर्ण होण्यासाठी आता निधीची आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज निर्माण झाली आहे.  

नांदेड शहर हे शीख धर्मियांचे प्रमुख प्रार्थनास्थळ आहे. हे शहर यापुर्वी देशातील महत्वाच्या स्थानकांशी जोडले गेले असले तरी कर्नाटकातील बिदर येथे शीख भाविकांचा गुरुद्वारा आहे. नांदेडला अमृतसर येथून आलेले शीख भाविक वेळात वेळ काढून बिदर या ठिकाणी गुरु नानक जिऱ्हा साहिब गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी हमखास जात असतात. सध्या नांदेड येथून पर्यायी मार्ग उपलब्ध असला तरी हा नवीन मार्ग लवकर पुर्ण झाल्यास दोन महत्वाची प्रार्थनास्थळे, दोन राज्य एकमेकांशी जोडली जातील, हे यातील विशेष.  

अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठविला 
मागील तीन ते चार वर्षापूर्वी या रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी पाठपुरावा केला होता. तसेच खासदार प्रताप पाटील चिखलीकर, गुरुद्वारा बोर्डाचे भुपिंदरसिंग मिनहास यांच्यासह सदस्यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे मागणी केली होती. याबाबत दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या सिकंदराबाद येथील एफए, सीएओ या विभागाने रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण त्यातील स्थानके, जमीन, अंदाजित खर्च, मार्ग सुरु करण्यासाठी योग्य की अयोग्य याचा अहवाल तयार केला. तो नुकताच रेल्वे बोर्डाकडे मंजुरासाठी पाठविण्यात आला आहे. यापुढे लवकर मार्गाचे निर्माण होण्यासाठी त्यास लागणाऱ्या निधीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि नांदेडसह सिकंदराबाद येथील रेल्वे अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.   

हेही वाचा - नांदेड महापालिकेत सभापती, उपसभापतींची निवड


मार्गावरील महत्वाची स्थानके
नांदेड, मुगट, कामळज, माळकुठा, नायगाव, नरसी, बेटमोगरा, माऊली, देगलूर, मरखेल, हाणेगाव, औराद, संथपुर, हौदगाव, जानवाडा, खानापूर जं., बिदर. नव्याने मंजुर करण्यात आलेल्या स्थानकावर एकूण १३ रेल्वे स्थानके असणार आहेत, ज्‍यात नायगाव, नरसी, देगलूर, हाणेगावसारखी महत्वाची गावे आणि तालुके रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहेत. 

हेही वाचा - हिंगोली : ७५ लक्ष रुपयाच्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेला मंजुरी

मार्गासाठीचे अंदाजपत्रक  
नांदेड-बिदर या नव्या रेल्वेमार्गाची एकूण लांबी १५७.०५० किलोमीटर असणार आहे. यामध्ये मार्गासाठी एकूण खर्चाचे अंदाजपत्रक २५६४.६७ करोड एवढे असून ज्यात प्रति किलोमीटर १६.१० करोड एवढा खर्च अपेक्षित आहे. या मार्गादरम्यान भूसंपादनासाठी एकूण जमीन ९१०.१८ हेक्टर एवढी असून यातील ३६४.९४ एवढी जमीन प्रकल्पासाठी लागणार आहे. मार्गावर महत्वाचे दोन पुल, तर एक मोठा आणि ११९ छोटे-मोठे पुल असणार आहेत. याबाबतची माहिती सुत्रांनी दिली.

मार्गाच्या ठळक बाबी
एकूण लांबी - १५७.०५० किलोमीटर
मार्गावरील प्रस्तावित स्थानके - १३
एकूण खर्चाचे अंदाजपत्रक - दोन हजार ५६४.६७ करोड
प्रति किलोमीटर लागणारा खर्च - १६.१० करोड
भूसंपादनासाठी एकूण जमीन ९१०.१८ हेक्टर
मार्गावर एक मोठा आणि ११९ छोटे-मोठे पुल