
नांदेड : बिलोलीत शिवसृष्टी जंगलाला अचानक लागली आग
बिलोली : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील प्रसिद्ध दत्त टेकडीच्या माथ्यावर असणाऱ्या शिवसृष्टी परिसरातील वनविभागाच्या जंगलाला मंगळवारी दुपारी अचानक भीषण आग लागली असल्याने एकच खळबळ उडाली मात्र या आगीने कुठलीही जीवित हानी झाली नाही. या आगीमुळे माळरानाच्या पायथ्याशी असलेल्या मानवी वस्तीत भितीचे वातावारण निर्माण झाले होते.
बिलोली तालुक्यात गेल्या दोन दिवासांपुर्वी बोळेगाव येथे मानवी वस्ती परिसरात कडब्याच्या गंजीला भीषण आग लागली होती, यामध्ये शेतकऱ्यांचा चारा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला होता. त्यानंतर तालुक्यात अनेक आगीच्या घटना घडत आहेत. यामध्ये मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक शिवसृष्टी जंगलाला आग लागली. दुपारच्या वेळी सोसाट्याचा वारा असल्यामुळे ही आग वाऱ्याच्या वेगाने अतिशय झपाट्याने संपूर्ण जंगल परिसरात पसरली होती.
ही बातमी वन विभागास समजताच बिलोली विभागाचे वनपाल शेख फरीद,बामणी क्षेत्राचे वनरक्षक गिरीश कुरुडे तसेच डी.एस. मुसळे वनरक्षक बिलोली वनसेवक सुनील गायकवाड, साईनाथ ठकरोड, शेषराव इंगळे, प्रकाश कांबळे, संम्यक रुमाले, केशव चेन्नेवार कर्मचारी इत्यादी कर्ममचारी घटनास्थळी धाव घेत जीवाची बाजी लावून आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तीन वाजेपर्यंत देखील जंगलाला लागलेली आग आटोक्यात आली नव्हती. या आगीमुळे जंगलातील अनेक झाडेझुडपे जळून खाक झाली आहेत. आगीमुळे प्रत्यक्षदर्शींनी जीवित हानी झाली नसली तरी वन्य प्राण्यांची जीवित हानी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरात उलटसुलट चर्चा :
वन विभागाने गेल्या दोन वर्षापासून बिलोली येथील दत्त मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केलेली आहे आणि नेमकी याच भागात ही आग लागली जात असल्याने नेमकी आग लागली की लावली गेली? याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील हा विषय मोठा गांभीर्याने घेतल्याचे समजले आहे. या आगीमुळे वन परिसरातील जंगलाचे देखील मोठे नुकसान आगीमुळे झाले आहे. आग विझवण्याचे काम अद्यापपर्यंत सुरू असल्यामुळे नेमकी किती हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले याची माहिती देणे शक्य नसल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
Web Title: Nanded Biloli At Shivsrushti Forest Fire No Casualtie Incident
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..