Video-नांदेड भाजप महिला आघाडीचा राज्य शासनाविरोधात आक्रोश

प्रमोद चौधरी
Monday, 12 October 2020

महाविकास आघाडीचे सरकार महिलांच्या सुरक्षिततेबाबत निष्क्रिय ठरत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसंदर्भात असमर्थ ठरलेल्या राज्य सरकारच्या विरोधात नांदेडमध्ये भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने सोमवारी आक्रोश आंदोलन करण्यात आले.   

नांदेड : राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असूनही महाविकास आघाडीचे सरकार गप्पच आहे. त्यांना जागे करण्यासाठी नांदेड भाजप महिला आघाडीतर्फे महात्मा फुले पुतळ्याजवळ सोमवारी (ता.१२) आक्रोश आंदोलन केले. 

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महिला आघाडीने हे आक्रोश आंदोलन केले. महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. कोरोना महामारी सारख्या अतिसंवेदनशील काळातही कोविड सेंटर व रुग्णालयामध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्र सुरुच आहे. मात्र महाविकास आघाडीचे सरकार महिलांच्या सुरक्षिततेबाबत निष्क्रिय ठरत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसंदर्भात असमर्थ ठरलेल्या राज्य सरकारच्या विरोधात हे आक्रोश आंदोलन करत असल्याचे महिलांनी सांगितले. 

हेही वाचा - सबसिडीसाठी ग्राहकांना सोसावा लागतोय आर्थिक भूर्दंड

महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. दररोज बलात्कार, विनयभंग, हत्याकांडाचे सत्र सुरु आहे. महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. कोरोना महामारी सारख्या अतिसंवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पीटलमध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्र सुरुच आहे. जालना जिल्ह्यातील मंठा येथे वैष्णवी गोरे यांचा खुन, बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार, इचलकरंजी येथे क्वारंटाईन सेंटरमध्ये मुलीचा विनयभंग, चंद्रपुर येथे १६ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला. 

हेही वाचलेच पाहिजे - तीन अनाथांचा ‘एक नाथ’ शोधण्यासाठी संघर्ष सुरू

याशिवाय उस्मानाबाद शहराजवळील राघुचीवाडी येथे अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांकडून बलात्कार अशा अनेक निंदनीय घटना घडत असतांनाही महाविकास आघाडी सरकार आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी कुठलीच पावले उचलताना दिसत नाही. त्यासाठी भाजपच्या महिला आघाडीच्यावतीने सोमवारी राज्यस्तरीय आक्रोश आंदोलन छेडल्याचे डॉ. शीतल भालके, नगरसेविका बेबीताई गुपिले, श्रद्धा चव्हाण, शततारका पांढरे, महादेवी मठपती, सुष्मा ठाकूर, सुरेखा जोशी, अनुराधा गिराम, अश्विनी जाधव या महिला कार्यकर्त्यांनी सांगितले. आंदोलनामध्ये खासदार प्रताप पाटील चिखलीकर, दिलीप कंदकुर्ते यांच्यासह महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded BJP Womens Front Protests Against The State Government