Nanded Breaking : गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील २० कर्मचारी पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या २६

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

सदर व्यक्तींना एनआरआय भवन कोविड केयर सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात विषाणू बाधित झालेल्या गुरुद्वारा परिसरात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

नांदेड : पहिल्या लॉकडाउनदरम्यान एकही रुग्ण नसलेल्या नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील २० कर्मचाऱ्यांचा अहवाल शनिवारी (ता.दोन मे) पॉझिटिव्ह आल्याने, नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता २६ झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी सांगितले.

पंजाबमधून चार हजाराहून भाविक येथील सचखंड गुरूद्वाराचे व हल्ला-मोहल्ला या कार्यक्रमासाठी दर्शनासाठी आले होते. हे सर्व भाविक पंजबाकडे जाण्याच्या तयारीत असतानाच देशभरात कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे देशभर लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे पंजाबमधील चार हजारहून अधिक यात्रेकरू नांदेडमध्येच अडकून पडले होते. तब्बल एक महिन्यानंतर महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पुढाकारातून अखेर या यात्रेकरूंच्या पंजाबला परत जाण्याचा हालचाली झाल्या. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५०० च्या आसपास यात्रेकरू नांदेड प्रशासनाने वेगवेगळ्या ट्रॅव्हल्सद्वारे त्यांना पंजाबमध्ये सोडण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यात पंजाब सरकारने पाठविलेल्या ७९ ट्रॅव्हल्स बसद्वारे उर्वरीत भाविक पंजाबकडे रवाना झाले आहेत.

हेही वाचा - Video : ही वेळ आरोप-प्रत्यारोपाची नाही, असे कोण म्हणाले ते वाचाच

हे सर्व भाविक पंजाबकडे रवाना झाल्यानंतर म्हणजे ३० एप्रिल ते एक मे २०२० या कालावधीत गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील ९७ व्यक्तिंचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी (ता.दोन) प्राप्त झाला असून त्यात २० कर्मचारी हे कोरोना विषाणूमुळे बाधित झाल्याचे आढळून आले आहेत. तर २५ व्यक्तिंचे अहवाल हे निगेटिव्ह तसेच ११ स्वॅब हे अनिर्णित आहेत. त्यामुळे आता उर्वरीत अहवालांची प्रतिक्षा आहे. सदर व्यक्तींना एनआरआय भवन कोविड केयर सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात विषाणू बाधित झालेल्या गुरुद्वारा परिसरात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

असा आहे आजपर्यंतचा तपशील

  • एकूण घेण्यात आलेले स्वॅब - ११२०
  • अहवाल निगेटिव्ह - १००९
  • स्वॅब अहवाल प्रलंबित - ६५
  • स्वॅब तपासणीची आवश्‍यकता नाही - ०५
  • निष्कर्ष निघाला नाही - १४
  • एकूण पॉझिटिव्ह - २६
  • मृत्यू - ०२

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded Breaking: Gurudwara Langar Sahib Area 20 Staff Positive Nanded News