
नांदेड : रस्त्यांची दर्जेदार कामे वेळेत पूर्ण करा; महापौर जयश्री पावडे
नांदेड : शहरातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे त्या निधीचा योग्य विनीयोग करा. रस्त्यांची कामे दर्जेदार, नियोजीत वेळेत पुर्ण करा, अशा सुचना महापौर जयश्री निलेश पावडे यांनी सोमवारी झालेल्या महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त बैठकीत दिल्या.
नांदेड शहरात मुलभूत सोयी सुविधा देत असतांनाच महापालिकेच्या हद्दीतील अंतर्गत आणि मुख्य रस्ते दर्जेदार आणि उत्कृष्ट करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री चव्हाण यांनी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिला आहे. शहराचा कायापालट करणा-या रस्ते विकासाच्या कामाला पालकमंत्र्यांच्या हस्ते नुकतीच सुरवात करण्यात आली आहे. महापालिकेतर्फे करण्यात येणारी सर्व प्रभागातील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम येत्या पावसाळयापुर्वी पुर्ण करावे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येणा-या मुख्य रस्त्यांच्या कामाचा दर्जाही राखावा, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात समन्वय ठेवून दोन्हीही विभागांमार्फत करण्यात येणारी कामे ही नियोजीत वेळेत पुर्ण करण्यात यावीत, त्यासाठी अडीअडचणी सोडविण्यासाठी त्या त्या प्रभागातील नगरसेवकांशी संपर्क साधून त्या अडचणी सोडवाव्यात.
कंत्राटदार आणि अभियंत्यांनी यासाठी विलंब न लावता तातडीच्या उपाययोजना करत निर्माण झालेली समस्या तत्काळ सोडवून घ्यावी. जेणेकरुन पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामे पूर्ण करता येतील, अशा सुचनाही महापौर पावडे यांनी केल्या. सार्वजनिक बांधकामच्या वतीने शहरातील ७० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांच्या कामालाही सुरवात झाली आहे. ही कामे करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी ज्या भागातील कामे सुरु होतील. त्या कामांची माहिती महापालिकेच्या अभियंता आणि संबंधित विभागाला द्यावी ज्यामुळे त्या त्या भागातील नागरीकांची होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करता येतील. असेही महापौर पावडे यांनी सुचित केले.
उपमहापौर अब्दुल गफ्फार यांनी नव्याने तयार करण्यात येणा-या रस्त्यांलगत झाडांसाठी ठिकठिकाणी योग्य नियोजन करावे, असे सुचित केले तर सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे यांनी रस्त्यांची कामे दर्जेदार आणि योग्य ती काळजी घेवून करावीत, अशा सुचना दिल्या. या बैठकीस आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरीक्त आयुक्त गिरीष कदम, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता राहुल तोंडले, उप अभियंता नाईक, उप अभियंता दिलीप टाकळीकर, अरुण शिंदे, नरेंद्र सुजलेगांवकर, कनिष्ठ अभियंता सुर्यवंशी, उत्तम स्वामी यांच्यासह कंत्राटदार आदी उपस्थित होते.
Web Title: Nanded Complete Quality Road Construction Works On Time Jayashree Pavade
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..