Nanded Corona : रविवारीही पॉझिटिव्हची मालिका सुरुच

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

रात्री १० वाजता ३२ स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये उमर कॉलनी (देगलूर नाका) येथील ५४ वर्षीय पुरुष तर गुलजार बाग येथील ५५ वर्षीय महिला अशा दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

नांदेड :  रविवारीही (ता. सात) कोरोना पॉझिटिव्हची मालिका सुरुच राहिली. रात्री १० वाजेनंतर आलेल्या अहवालामध्ये दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. त्यामुळे आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९२ वर गेली आहे.

रविवारी दुपारी पाच वाजता ३२ स्वॅब नमुने अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील २७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर पाच अहवाल अनिर्णित अवस्थेत आहेत. त्यामुळे रविवारचा दिवस नांदेडकरांसाठी मोठा दिलासा देणार ठरला होता. मात्र, रात्री १० वाजता ३२ स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये उमर कॉलनी (देगलूर नाका) येथील ५४ वर्षीय पुरुष तर गुलजार बाग येथील ५५ वर्षीय महिला अशा दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

दोन रुग्णांना डिस्चार्ज

डॉ. भोसीकर म्हणाले की, ‘‘उपचार सुरू असलेल्या ५३ रुग्णांतील तीन पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एक ६५ वर्षी महिला आणि ६५ व ७४ वर्षीय दोन पुरुष यांच्याकडून औषधोपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांची तब्येत नाजुक झाली आहे. मात्र, असे असले तरी त्यांच्यावर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. रविवारी पंजाब भवन यात्री निवास येथील दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.’’

रविवारी पुन्हा ५९ संशयित व्यक्तींचा स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, त्यांचा अहवाल सोमवारी (ता. आठ) सायंकाळपर्यंत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १९२ इतकी झाली असून, यापैकी आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

कोरोनाची दिवसभरातील संक्षिप्त माहिती

 • आतापर्यंत एकूण संशयित - चार हजार ४५३
 • एकूण क्वारंटाइन व्यक्तींची संख्या - चार हजार २१२
 • क्वारंटाइन कालावधी पूर्ण - दोन हजार २७९
 • अजून निरीक्षणाखाली असलेले - १०२
 • त्यापैकी दवाखान्यात क्वारंटाइनमध्ये - १६२
 • घरीच क्वारंटाइनमध्ये असलेले - चार हजार ५०
 • आज घेतलेले नमुने - ५९
 • एकूण नमुने तपासणी - चार हजार ४५३
 • एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - १९२
 • त्यापैकी निगेटिव्ह - तीन हजार ९४२
 • नमुने तपासणी अहवाल बाकी - ५९
 • नाकारण्यात आलेले नमुने - ८१
 • अनिर्णित अहवाल - १७४
 • कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - १३१
 • कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू संख्या - आठ
 • जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी एक लाख ४२ हजार ९५६ असून त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded Corona: A series of positives continues on Sunday Nanded News