Nanded : दुष्काळ अनुदानाची १४ कोटी रुपये रक्कम खात्यात जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer Crop Damage compensation

Nanded : दुष्काळ अनुदानाची १४ कोटी रुपये रक्कम खात्यात जमा

हदगाव : यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप हंगाम पूर्णतः हातचा गेला असल्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून आता वर्षभर संसाराचा गाडा कसा हाकायचा या विवंचनेत शेतकरी असतांनाच शासनाने दुष्काळ अनुदान जाहीर केले असून प्रतिहेक्टरी ९ हजार ५२० याप्रमाणे १३ हजार १०८ सभासद खातेदारांच्या खात्यामध्ये एकूण १४ कोटी ३९ लक्ष ९७ हजार ९८४ एवढी रक्कम हदगाव तालुक्याकरीता नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जमा करण्यात आली आहे.

खरीप हंगाम २०२२-२३ या वर्षांमध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आदी नगदी पिकांचे यावर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने मोठे नुकसान होऊन हातची पिके गेली. परिणामी, शेतकरी पुरता हवालदिल झाला. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून गावोगावच्या शेती पिकांचे पंचनामे करण्यात आले.

यामध्ये ७० टक्के नुकसान ग्राह्य धरून महसूल विभागाने शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० दुष्काळ अनुदान जाहीर केले असले तरी पण तालुक्यात मात्र पिकांचे ७० टक्केच नुकसान झाले असल्याचा अहवाल महसूल कर्मचाऱ्यांनी दिल्याने याप्रमाणे १३ हजार ६००च्या ऐवजी ९ हजार ५२० रुपये प्रति हेक्‍टरी याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

गावांची सुरुवात अल्फाबेटिकली झेड पासून सुरुवात करण्यात आली असून त्याप्रमाणे गावाचे वाटप सुरू करण्यात आले असल्याचे नांदेड जिल्हा मध्यवर्ती शाखा हदगावचे शाखा व्यवस्थापक सुभाष बारसे यांनी ‘सकाळ’शी बोलतांना ही माहिती दिली.

झेड टू ए याप्रमाणे अल्फाबेटीकल गावांना सुरुवात करण्यात आली असून ज्या शेतकरी खातेदारांना एटीएम वाटप करण्यात आले आहेत त्यांनी आपली ही रक्कम एटीएमने सुद्धा उचलू शकतात असेही कळविण्यात आले आहे. १३ हजार १०८ सभासद खातेदार संख्येपैकी २ हजार ७०० खातेदारांकडे एटीएम आहेत अशीही माहिती यावेळी श्री सुभाष बारसे यांनी बोलतांना दिली.

बँकांमध्ये मोठ्या प्रमाणातील गर्दी पाहता एटीएम चे वाटप गावोगावी जाऊन करण्यात आले असून मागणीनुसार प्रत्येकास एटीएम देण्यात आले आहेत आणि याही पुढे नवीन एटीएम मागणीनुसार सर्वांना देण्यात येतील असेही शाखा व्यवस्थापक सुभाष बारसे यांनी बोलतांना सांगितले.

मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी सुट्टीतही कामावर

नांदेड जिल्हा मध्यवर्ती शाखेतील शाखा व्यवस्थापकांसह प्रत्येक कर्मचारी दीपावलीच्या सुट्ट्यांचा उपभोग न घेता तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात व उत्साहात साजरी व्हावी, त्यांना गोडधोड, साडी चोळी खरेदी करता यावी या उदात्त हेतूने काम करत आहेत. शासनाकडून बँकांमध्ये जमा झालेले दुष्काळी अनुदान प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याकरीता बँकांतील एक ना एक कर्मचारी शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळ अनुदानाची रक्कम जमा करण्याकरीता व वाटप करण्याकरीता बँकांमध्ये काम करत आहेत.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक सुभाष बारसे यांच्यासह बँकातील कर्मचाऱ्यांचे तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कौतुक, अभिनंदन व आभार व्यक्त केले जात आहेत.