नांदेड : पत्नीला नांदायला पाठवत नसल्याने जावयाने उचलले ‘हे’ पाऊल...

सद्दाम दावणगीरकर
Thursday, 17 September 2020

जावयाने सासऱ्याचा केला निर्घृण खून, पत्नीला माहेरी ठेवल्याचा राग, मानूर येथील घटना

मरखेल (जिल्हा नांदेड) : सासरच्या नेहमीच्या जाचाला कंटाळून आपल्या मुलीस आपल्या माहेरी ठेवणाऱ्या सासऱ्याला पत्नीस नांदायला पाठवून का देत नाहीस असे म्हणून जावयाने सासरवाडीत येऊन सासऱ्याचा निर्घृण खून केला. या खूनप्रकरणी जावई व मुलीच्या सासऱ्याविरुद्ध मरखेल पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंदविला आहे. दोघांनाही मरखेल पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (ता. १६) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास मानूर येथे घडली.

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील रमेश शामराव पांढरे (वय ५५) रा. मानूर (ता. देगलूर) यांची मुलगी सुरेखा हिचा विवाह बेंबरा येथील उमाकांत मुरलीधर सोलंकर याच्याशी गेल्या दहा वर्षांपूर्वी रितिरिवाजाप्रमाणे झाला होता. लग्नानंतर सुरेखा हिस सासरच्या मंडळींकडून वारंवार नाहक शारीरिक व मानसिक त्रास होत होता. या त्रासाला कंटाळून ती मागील काही महिण्यापासून माहेरी राहत होती. बाळंतपणासाठी माहेरी घेऊन आल्यावर गेल्या अकरा महिन्यांपासून सुरेखाला सासरी पाठविले नव्हते.

हेही वाचा -  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची गरुडभरारी

वीट छातीत मारुन सासऱ्याचा खून

बुधवारी (ता. १६) रोजी सुरेखाचा पती उमाकांत मुरलीधर सोलंकर व सासरा मुरलीधर गुंडेराव सोलंकर (दोघे रा. बेंबरा, ता. देगलूर) हे तिच्या माहेरी आले. सकाळी अकराच्या सुमारास घरी येऊन मुलीला सासरी पाठविण्याची चर्चा करून आताच आमच्यासोबत मुलीला पाठवून देण्याचा आग्रह धरला. यावेळी रमेश पांढरे यांनी सांगितले की, अमावस्या झाल्यावर नांदायला पाठवून देतो. यावरुन जावई व सासरा यांच्यात वाद झाला. जावई व त्याच्या वडिलाने रमेश पांढरे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. अंगणातील वीट घेऊन जावयाने छातीवर मारल्याने सासरा रमेश पांढरे हा गंभीर जखमी झाला. त्यांना तात्काळ उपचारासाठी हणेगाव येथील प्राथमीक रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय सुत्रांनी सांगितले. 

मरखेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मानूरचे सरपंच लच्छमारेड्डी मोगलरेड्डी यांनी मरखेल पोलिसांना या घटनेविषयीची माहिती दिली. दरम्यान मयत रमेश पांढरे यांचे पार्थीव येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन प्रक्रियेसाठी आणण्यात आले होते. शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी उशिरा दोघांवर खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. मात्र काही गावपुढाऱ्यांनी हे प्रकरण पोलिसांच्या परस्पर मिटविण्याचा रात्री उशिरापर्यंत प्रयत्न चालविला. मात्र मयताची मुलगी सुरेखा ही या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा नोंदविण्यावर ठाम राहिल्याने गुरुवारी (ता. १७) रोजी या गुन्ह्याची पोलिसांत नोंद झाली. मयताची पत्नी चंद्रकलाबाई रमेश पांढरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर करत आहेत.
 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: daughter of son took 'this' step as he was not sending his wife to Nanded news