नांदेड : कोरोनामुळे मृत्यू स्वस्त पण अंत्यविधी अवघड

प्रल्हाद कांबळे
Thursday, 17 September 2020

मृत व्यक्तीचे दुः ख विसरून रुग्णवाहिका लवकर कशी येईल याचा पाठपुरावा करण्याची वेळ त्यांच्यावर येत असल्याने महापालिका प्रशासनाची असंवेदनशीलता ठळकपणे समोर आली आहे.

नांदेड : कोरोनामुळे सर्वच यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र मागील काही दिवसापसून शहरात दिसत आहे. एकीकडे जवळची व्यक्ती मृत पावल्याचे दुःख असताना दुसरीकडे रुग्णवाहिकेसाठी तासंतास ताटकळत बसावे लागत असल्याने मृत व्यक्तींच्या नातलगांना ताटकळत बसावे लागत आहे. मृत व्यक्तीचे दुः ख विसरून रुग्णवाहिका लवकर कशी येईल याचा पाठपुरावा करण्याची वेळ त्यांच्यावर येत असल्याने महापालिका प्रशासनाची असंवेदनशीलता ठळकपणे समोर आली आहे.

कोरोना बाधित रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले असून एखाद्या दिवशी हा आकडा वाढल्यास प्रशासकीय यंत्रणेची धांदल उडत असली तरी अंत्यसंस्कारासाठी तिष्ठत बसण्याची वेळ आलेल्या नातलगांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या फक्त दोनच शववाहिन्यांच्या खांद्यावरच काम सुरू असून वाढते रुग्ण संख्या व मृत्यूचे प्रमाण पाहून महापालिकेने रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्याची गरज आहे.

हेही वाचा -  मराठवाडा (हैदराबाद) मुक्तीसंग्रामाचा दैदिप्यमान लढा...

गंभीर रुग्णांचा आकडाही चिंताजनक 

नांदेड शहरात कोरोना साथीचा फैलाव गतीने पसरत आहे. रुग्णांची संख्या भरमसाठ वाढल्याने रुग्णालयात खाट शिल्लक राहिली नाही. रुग्ण संख्या वाढत असल्याने गंभीर रुग्णांचा आकडाही चिंताजनक पातळी गाठणारा ठरला आहे. त्यामुळे एखाद्या दिवशी अचानक मृत्यूचा आकडा वाढत आहे. हा आकडा दहा किंवा त्यापेक्षा जास्तीचा आला की अंत्यसंस्कार प्रक्रिया विलंबाने होत आहे. उपचारापर्यंत आरोग्य यंत्रणा रुग्णांची काळजी घेत असली तरी मयत झालेल्या रुग्णांवर कधी, कुठे आणि कसे अंत्यसंस्कार करावयाचे याचे नियोजन महापालिका स्तरावरून केले जात आहे.

महापालिकेकडे केवळ दोनच शववाहिनी वाहन उपलब्ध 

कोरोना संक्रमणामुळे रुग्णांचा मृत्यू झाला तर त्याचे पार्थिव शरीर नातेवाईकांच्या ताब्यात दिले जात नाही. हा नियम सर्वांसाठी असला तरी स्थानिक महानगरपालिका अंत्यसंस्काराची प्रक्रिया वेळेत पार पाडण्यात अपयशी ठरत आहे. कारण महापालिकेकडे केवळ दोनच शववाहिनी वाहन उपलब्ध आहेत. या दोन वाहनाच्या जीवावरच महापालिका सर्व नियोजन लावत असल्याने परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. मृताच्या नातेवाईकांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

येथे क्लिक करा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची गरुडभरारी

लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था उभारावी
 

पाच ते सात लाख लोकवस्ती असलेल्या नांदेड शहरात स्थानिक महानगरपालिका केवळ दोन शववाहिन्या कोरोना साथीचा सामना करत आहे. कोरोना साथीचा उद्रेक झाला तर मरण सोपे पण त्यानंतरची प्रक्रिया अत्यंत किचकट होत आहे. या समस्येकडे वेळीच लक्ष देऊन त्यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे. निदान लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्य व्यवस्थेची तात्काळ उभारणी महापालिकेने करावी अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Death by corona is cheap but funeral is difficult nanded news