नांदेड : मुदखेड तालुक्यात लोकशाहीचा लिलाव, उपसरपंचपदासाठी साडेदहा लाखाची बोली

file photo
file photo

मुदखेड (जिल्हा नांदेड) : पैशातून निवडणूका आणि निवडणुकीतून पैसे असे समीकरण झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीपुर्वी सरपंच तसेच उपसरपंचपदाचा जाहीर लिलाव करुन लोकशाहीची थट्टा केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुदखेड तालुक्यातील महाटी या गावामध्ये शनिवारी (ता.२१) येथील उपसरपंचपदासाठी गावकऱ्यांनी साडेदहा लाखाची बोली लावून उपसरपंचपद बहाल केले आहे.

महाटी येथील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीसाठी सरपंच व उपसरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले. महाटी हे गाव गोदावरीच्या काठावर असून गावात जिल्ह्यातील सर्वात जास्त वीटभट्ट्या आहेत. यासोबतच गावालगत असलेल्या गोदावरी नदीमुळे वाळू तसेच वीट भट्टीसाठी लागणाऱ्या मातीचा अवैध व्यवसाय कोट्यवधींच्या उलाढालीत होतो. यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना भाव आला आहे. मुदखेड येथील पन्नास गावांचे सरपंचपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून महाटीचे सरपंचपद ओबीसीसाठी आरक्षित झाले आहे. ग्रामपंचायत आपल्या ताब्यात यावी म्हणून या अवैध व्यवसायवाल्यांनी चक्क पदाची बोलीच लावल्याचे पहावयास मिळाले. तसा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल सुध्दा झाला.

शनिवारी (ता.२१) रोजी रात्री आठ वाजता गावच्या मारुती मंदिराबाहेरील ओट्यावर गावकरी एकत्रित जमले. येथे बैठक घेऊन उपसरपंचपदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार गावातील विद्यमान सरपंच प्रतिनिधी बळीराम पाटील ढगे, सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी व्यंकटराव मारोतराव ढगे, माजी सरपंच माधवराव तानाजी ढगे यांनी या बोलीत सहभाग घेतला.

उपसरपंचपदाच्या बोलीची सुरवात सात लाख एक हजार रुपये ठेवण्यात आली होती. त्यानुसार ही स्पर्धा वाढत गेली तशी बोलीही वाढली. अखेर उपसरपंचपदासाठी साडेदहा लाखाची शेवटची बोली माधवराव तानाजी ढगे यांनी लावली. अखेर या बोलीस गावकऱ्यांनी हिरवा कंदील दिला. अशाप्रकारे महाटीमध्ये लोकशाहीचा लिलाव होऊन उपसरपंचपद साडेदहा लाखात गावकऱ्यांनी विक्री केले.

डिजिटल शाळा खोल्यांसाठीच पदाचा लिलाव

या गावात शनिवारी रात्री लावलेल्या उपसरपंचपदाच्या बोलीचा व्हिडिओ झपाट्याने सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यानुसार बोलीत भाग घेतलेले बळीराम पाटील ढगे यांच्याशी संपर्क साधून विचारले असता लावलेली बोली खरी असल्याचे त्यांनी सांगितले. यातून मिळणाऱ्या पैशातून गावच्या शाळेसाठी डिजिटल खोल्या बनविण्याचा गावकऱ्यांचा मानस होता. हा पैसा शाळा सुधारण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com