नांदेडमध्ये संस्थाचालकाने बेरोजगार युवकाला बारा लाखाला लुटले; गुन्हा दाखल 

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 3 March 2021

किनवट तालुक्यातील घोटी येथील निवासी मतिमंद विद्यालयाच्या संस्थाचालकांच्या या कारनाम्यामुळे त्याच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेड : हातात पदव्यांचे भेंडोळे घेऊन नोकरी मिळावी यासाठी दारोदार भटकणाऱ्या एका युवकास मतीमंद शाळेवर शिक्षकाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याला बारा लाखाचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किनवट तालुक्यातील घोटी येथील निवासी मतिमंद विद्यालयाच्या संस्थाचालकांच्या या कारनाम्यामुळे त्याच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लातूर येथील एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाला विशेष शिक्षक पदाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून संस्थाचालकाने १२ लाखाला गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नांदेड शहरातील नाथनगर येथील संस्थाचालक बालाजी पावडे याने घरी बोलावून घोटी येथील निवासी मतिमंद विद्यालयात विशेष शिक्षक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार संतोष भारत शिवशक्ती राहणार काळनुर,तालुका जळकोट, जिल्हा लातुर हल्ली मुक्काम रविनगर कौठा याच्याकडून बारा लाख रुपये घेतले. संबंधित संस्थाचालकाने सन २०१४ ते २०१६ या कालावधीमध्ये त्याला विश्वासात घेऊन रक्कम घेतलेली होती. परंतु विशेष शिक्षक पदाची नेमणूक मात्र पैसे देऊन देखील दिलेली नाही.

सुशिक्षित बेरोजगार असलेल्या संतोष शिवशक्ती याने गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक पदाची नेमणूक मिळावी यासाठी नाथनगर येथील संस्थाचालक आरोपीकडे पाठपुरावा केला. परंतु संबंधित संस्थाचालकाने शिवशक्ती यांना टोलवाटोलवी करुन उडवाउडवीची उत्तरे दिली. एक तर नोकरी द्या अन्यथा घेतलेले पैसे परत करा अशी मागणी केली असता संस्थाचालकाने उलट जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. संबंधित संस्थाचालकाने ता. १० सप्टेंबर २०१४ रोजी बारा लाख रुपये घेऊन नोकरी न लावता संतोष शिवशक्ती यांचा विश्वासघात केला. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यांमध्ये आरोपी संस्थाचालक बालाजी पावडेविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक एकनाथ देवके करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nanded, the director cheating an unemployed youth of Rs 12 lakh; Filed a crime nanded news