esakal | Nanded : गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded : गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरूच

Nanded : गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरूच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : गोदावरी नदीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा सद्य:स्थितीत नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगणा राज्यातील पोचमपाड प्रकल्पात जावून मिळतो. हे धरण सुध्दा शंभर टक्के भरले आहे. पोचमपाड प्रकल्प भरल्याने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा फुगवटा निर्माण होतो. त्यामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावांना आणि नागरिकांना दक्षतेचा इशारा जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीत सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा विसर्ग ५६ हजार ५९२ क्सुसेक एवढा आहे. याचबरोबर निम्न दुधना प्रकल्पातून दोन हजार १८८ क्युसेक विसर्ग पाणी पुर्णा नदीपात्रात सुरु आहे. माजलगाव प्रकल्पातून १७ हजार ९७७ क्सुसेक, दिग्रस बंधाऱ्यातून तीन लाख ३९ हजार १८४ क्युसेक, पुर्णा प्रकल्पाच्या (येलदरी व सिद्धेश्वर) पाणलोट क्षेत्रात सिध्देश्वर धरणाखाली पुर्णा नदीत एक लाख १५ हजार ३५५ क्सुसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पूर्णा पुलाजवळ एक लाख ६७ हजार ६२९ क्युसेक विसर्ग सुरु आहे. या सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीला येवून मिळते.

नांदेड येथील विष्णुपुरी प्रकल्पाच्या १५ दरवाज्यातून दोन लाख ५५ हजार ८५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सद्यस्थितीत सुरु आहे. नदीमधून येणारा येवा जास्त असला तरी विष्णुपुरी प्रकल्पाद्वारे तो नियंत्रित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील व विसर्ग नियंत्रित केला जाईल असे नांदेड पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बी. के. शेटे यांनी सांगितले.

जुन्या पुलाजवळ सध्याची पाणीपातळी ३५३.०५ मीटर एवढी आहे. इशारा पाणीपातळी ३५१ मीटर तर धोका पातळी ३५४ मीटर इतकी आहे. गोदावरी नदीतील पाण्याची स्थिती लक्षात घेता शहरातील नदीकाठच्या नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता असून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे केले आहे.

उर्ध्व मानार प्रकल्प व निम्न मानार प्रकल्पही शंभर टक्के भरले असल्याने या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस, अतिवृष्टी झाल्याने पाणी नदीत सोडण्यात येत आहे. उर्ध्व मानार प्रकल्पातून आज सकाळी ११ वाजता एक हजार ५९ क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडले आहे. उर्ध्व पैनगंगा धरण शंभर टक्के भरल्याने धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास तेथील ११ दरवाजे उघडून १८ हजार ७१९ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी, पैनगंगा, पूर्णा, मांजरा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन नांदेड पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता शेटे यांनी केले आहे.

loading image
go to top