Nanded : नुकसानग्रस्तांचे ७१८ कोटी मिळाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded

Nanded : नुकसानग्रस्तांचे ७१८ कोटी मिळाले

नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सात लाख ४१ हजार शेतकर्‍यांचे पाच लाख २७ हजार हेक्टरमधील खरीप, बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. यात बाधीतांना लागणारा ७१७ कोटी ८८ लाख ९१ हजार सहाशे रुपयांचा निधी बुधवारी (ता.२१) जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या सूचनेनुसार हा निधी लगेच सर्वच सोळा तालुक्यांना वितरीत केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.जिल्ह्यात यंदा जुन ते ऑगस्ट महिन्या दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक मंडळात एकापेक्षा अधिक वेळा अतिवृष्टीची नोंद झाली होती. जुलैमध्ये तर एका महिन्यात विक्रमी ६०६ मिलीमीटर पाऊस होऊन पिकांची दाणादाण उडाली होती. अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर येऊन नदीकाठची जमिन खरडून गेली. सखल भागातील पिके पाण्याखाली गेल्याने जिरायतीमधील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, उडीद, मुग या पाच लाख २७ हजार १४१ हेक्टरवरील पिकांसह ३१४ हेक्टरवरील बागायती व ६६ हेक्टरवरिल फळपिके असे एकूण पाच लाख २७ हजार ४९१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. यात सात लाख ४१ हजार ९४६ शेतकर्‍यांना फटका बसला होता.

या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफच्या नव्या निकषानुसार (दुप्पट भरपाई) जिल्ह्यासाठी ७१७ कोटी ८८ लाख ९१ हजार सहाशे रुपयांची मागणी राज्य शासनानकडे केली होती. यानुसार ७१७ कोटी ८८ लाख ९१ हजार सहाशे रुपयांचा निधी बुधवारी (ता.२१) जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. यानंतर हा निधी लगेच सर्वच सोळा तालुक्यांना वितरीत केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी दिली.

नुकसानीच्या प्रमाणात मिळणार भरपाई

राज्य शासनाने यंदा भरपाईच्या रकमेत दुप्पट वाढ करुन तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत भरपाई देण्याचे निश्‍चित केले आहे. यामुळे जिरायती पिकांसाठी हेक्टरी १३ हजार सहाशे, बागायती पिकांसाठी २७ हजार तर बहूवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये मिळणार आहेत. ही भरपाई नुकसानीच्या प्रमाणात मिळणार आहे. स्थानिक यंत्रणेने पिकांचे ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे दाखविले आहे. यानुसार ही भरपाई मिळेल, अशी माहिती नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर अधिकृत सुत्राने दिली.

Web Title: Nanded District 718 Crores Received Victims

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..