नांदेड : जिल्हा आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर, कसा तो वाचा?

प्रल्हाद कांबळे
Saturday, 12 September 2020

अनेक रुग्णांना व्हेंटीलेटरशिवाय आपला प्राण गमवावा लागत आहे. मात्र जिल्हा आरोग्य यंत्रणेत कोणाचा कोणाला पायपोस नसल्याने या किंमती व अत्यावश्‍यक झालेल्या यंत्र धूळखात पडून

नांदेड : पंतप्रधान फंडातून आलेले २० व्हेंटीलेटर लोहा शासकिय रुग्णालयात धूळखात पडून असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून अनेक रुग्णांना व्हेंटीलेटरशिवाय आपला प्राण गमवावा लागत आहे. मात्र जिल्हा आरोग्य यंत्रणेत कोणाचा कोणाला पायपोस नसल्याने या किंमती व अत्यावश्‍यक झालेल्या यंत्र धूळखात पडून असल्याने आरोग्या यंत्रणेबद्दल रुग्ण व नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. 

कोरोना संक्रमणाचा जिल्ह्यात भडका उडालेला आहे. गंभीर रुग्णांची संख्या भरमसाठ वाढत आहे. खासगी आणि सरकारी रुग्णालयात रुग्णांना खाटा उपलब्ध नाहीत असे सांगितले जात असताना लोह्याच्या उपजिल्हा रुग्णालयात २० वेंटिलेटर वापराविना धूळखात पडून असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या एका वेंटिलेटरचे महत्त्व वाढले असताना तब्बल वीस व्हेंटिलेटर लोह्यात पडून असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार समोर आल्यानंतर या प्रकाराची चर्चा होत आहे.

हेही वाचा -  इसापूर धरण 95 टक्के भरल्याने- पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा

व्हेंटीलेटर असून वापर नाही

जिल्ह्यात कोरोनाची साथ दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांची संख्या दहा हजाराच्या पुढे पोहोचली आहे. खासगी  रुग्णालयाप्रमाणे शासकीय रुग्णालयातसुद्धा खाटा नाहीत असे सांगितले जात आहे. आरोग्य क्षेत्राचा विचार केला तर शासकीय रुग्णालयांच्या इमारती उभारल्या गेल्या असल्या तरी तेथे कोविड रुग्णांसाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही. बाहेरून टुमदार दिसणाऱ्‍या इमारती साथ रोगावर नियंत्रण करण्यासाठी पूर्ण क्षमतेने वापरल्या जात नाहीत असे दिसून आलेले आहे. यामुळे कोरोना रुग्णांना खासगी रुग्णालयामध्ये उपचार करून घ्यावे लागत आहे. गंभीर पूर्ण रुग्णावर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर अपुरे पडत आहेत. वरच्या स्तरावरून व्हेंटिलेटर खरेदी केली जात असली तरी या यंत्रणेचा वापरसुद्धा केला जात नसल्याचे लोहा प्रकरणावरून उघडकीस आले आहे.

येथे क्लिक करा - नांदेड जिल्ह्यातील ६२ केंद्रांवर रविवारी ‘नीट’ची परीक्षा, दोन परीक्षा केंद्रात बदल, जेईई मेन्सच्या गोंधळाची पुनरावृत्ती टळणार का? -

व्हेंटीलेटरविना अनेकांना जीव गमवावा लागत आहे

लोहा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाची साथ सुरु आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाला पीएम केअर सेंटर फंडातून २० व्हेंटीलेटर ण्यादेत आले आहेत. गंभीर रुग्णावर उपचार करण्यासाठी तालुकास्तरावरील या रुग्णालयाला ही यंत्रणा प्राप्त झाली आहे. मात्र लोह्याच्या उपजिल्हा रुग्णालयाला प्राप्त झालेले हे व्हेंटिलेटर वापराविना धूळखात पडून असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे असून ओळंबा नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. याचा फटका काहीं रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. व्हेंटिलेटर असताना त्याचा वापर होत नाही ही बाब धक्कादायक मानली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: District Health Department's is on the rise, how to read it nanded news