Nanded : अशोक चव्हाणांनी वेधले उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded : अशोक चव्हाणांनी वेधले उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष

Nanded : अशोक चव्हाणांनी वेधले उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष

नांदेड : राज्य शासनाच्या स्थगिती निर्णयांचा नांदेडकरांना फटका बसला असून, नागरिकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाल्याचे माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी (ता. १८) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदनानंतर श्री. चव्हाण यांनी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. महापालिका क्षेत्रामध्ये मुलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी तरतूद असलेल्या १५० कोटी रूपयांच्या निधी वितरणावर स्थगिती लावण्यात आली आहे. ऐन पावसाळ्यात या निर्णयामुळे रहदारीची कोंडी व जीविताला धोका निर्माण झाला असून, नागरिकांचे हाल होत आहेत.

महापालिकेच्या मालकीच्या महात्मा फुले व्यापारी संकुल व जनता मार्केटच्या दोन्ही इमारती वापरण्यायोग्य नसल्यामुळे खासगी भागीदारीतून नवीन इमारती उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र, शासनाच्या स्थगितीमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडणार असल्याचे चव्हाण म्हणाले. जलसंधारण महामंडळाने प्रशासकीय मान्यता दिलेल्या व निविदा स्तरावर असलेल्या जिल्ह्यातील १८६ कोटी रुपये किंमतीच्या १०१ कामांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

परंतु, या सर्वच कामांवर स्थगिती आल्याने नागरिकांचा अपेक्षाभंग झाला असून सर्वसामान्यांना होणारा त्रास लक्षात घेता स्थगितीचे सर्व निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी श्री. चव्हाण यांनी केली. तसेच नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. या शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांना शासनाने दिलेल्या स्थगितीमुळे रस्ते, पूल, इमारती, विश्रामगृहे, निवासी इमारती, रस्ते परिक्षण व विशेष दुरुस्ती, पूरहानी दुरुस्तीची आदी थांबलेली कामे, नांदेडला विभागीय आयुक्त कार्यालय, शासकीय कृषी महाविद्यालय, विद्युतीकरणासह लातूर ते नांदेड नवीन ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्प,

नांदेड येथे पोलीस आयुक्तालय, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अतिविशेषोपचार रुग्णालय, पिंपळढव साठवण तलावास प्रशासकीय मान्यता, इसापूर उजवा कालव्याची विशेष दुरुस्ती आदी विषयही श्री. चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडले. यावेळी विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, महापौर जयश्री पावडे आदींची उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत

नियोजित जालना - नांदेड द्रुतगती महामार्ग निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकेचे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्वागत केले आहे. मार्च २०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून आम्ही कामाला सुरूवात केली होती. हा प्रकल्प आता भूसंपादनाच्या टप्प्यात असून, त्यासाठी गेल्या अधिवेशनात २५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती.

मात्र, भूसंपादनाला लागणारा एकूण निधी अंदाजे २ हजार कोटी रूपये आहे. त्यामुळे शासनाने येत्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीच्या माध्यमातून आणखी एक हजार कोटी रुपये द्यावेत, अशी आमची मागणी आहे. अर्थ विभाग उपमुख्यमंत्री यांच्याकडेच असल्याने ते या प्रकल्पाला आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देतील, अशी आशा आहे.

Web Title: Nanded District Municipal Adjournment Development Work Ashok Chavan Demand Deputy Cm Devendra Fadnavis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..