नांदेड जिल्हा पुन्हा दाजी- भाऊजींच्या आरोप- प्रत्यारोपाने तापला

file photo
file photo

नांदेड : राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो. राज्यातील नव्हे देशातील राजकारण हे घराणेशाहीच्या मार्गाने जात असल्याचे पहावयास मिळते. त्याचे लोण जिल्हा व तालुकापातळीवर उमटत आहेत. जिल्ह्यात दाजी- भाऊजींचा कलगीतुरा काही नविन नाही. त्यातच पुन्हा एकदा दाजी - भाऊजींच्या आरोप- प्रत्यारोपाने राजकारण तापले आहे. दिवाळीपूर्वीच लोहा- कंधारमध्ये एकमेकांविरुद्ध शाब्दीक फटाके फुटू लागल्याने खासदार, आमदार समर्थक आमने- सामने आले आहेत.

कंधार व लोहा तालुक्यात एकही आरोग्य केंद्र अथवा उपकेंद्राला मंजुरी मिळालेली नसताना मंजुरी मिळाल्याचे सांगत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप आमदार शामसुंदर शिंदे यांनी शुक्रवारी जाहीररीत्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर भाजप तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी आमदार शामसुंदर शिंदे यांच्यावर शाब्दिक पलटवार केला आहे. खासदारांच्या पुण्याइने विधानसभेत पोहोचलेल्या आमदारकीचा वापर लोककल्याणासाठी करावा असा खोचक सल्ला त्यांनी आमदार शिंदे यांना दिला आहे.

निवडणूकीपासून धूसफुस सुरु

लोहा- कंधार विधानसभा मतदार संघावर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा मजबुत पगडा आहे. मागील अनेक वर्षापासून त्यांचे एकहाती वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीत खासदार चिखलीकर यांचे मेहुणे शामसुंदर शिंदे यांनी भाजपा कडून तिकिटाची मागणी केली होती. मात्र ही जागा अचानक शिवसेनेला सुटली. पर्यायाने श्यामसुंदर शिंदे यांनी शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन विधानसभा लढविली व विजयी झाले. आता आमदार शिंदे या मतदार संघात स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. यामुळे या मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. 

रुग्णालयांना मंजुरी मिळाल्याचे सांगत राजकीय श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी लोहा- कंधार तालुक्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्र खासदार चिखलीकर यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळाल्याचे चिखलीकर समर्थकांनी जाहीर केले होते. यानंतर मतदारसंघात काही ठिकाणी अशा आशयाचे फलकही झळकले होते. मात्र शुक्रवारी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दोन्ही तालुक्यातील एकाही ठिकाणी आरोग्य केंद्र अथवा उपकेंद्र मंजुरी मिळाली नसल्याचा दावा केला. या मंजुरी संदर्भात मंत्रालयात माहिती मागितली असता सार्वजनिक आरोग्य विभागाने ता. १२ ऑक्टोबर रोजी पत्र देऊन सन २०११ च्या लोकसंख्येवर आधारित नवीन आरोग्य केंद्र सुरू करणे अथवा कार्यरत असलेल्या रुग्णालयाचे श्रेणी प्रदान करण्यासाठी प्रस्तावित जोड आराखडा तयार कार्यान्वित करणे यासाठी आयुक्त स्तरावर ग्राहक आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. म्हणजेच केंद्राला मंजुरी मिळाली नसताना मंजुरी मिळाल्याचे सांगत राजकीय श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न झाल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी केला होता.

राजकीय जुगलबंदीत खासदार व आमदारांचे कार्यकर्ते मागे नाहीत

दरम्यान भाजप तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी शनिवारी सहज आमदारकी मिळालेले शिंदे भलतेच हुरळून गेल्याचे सांगत शिंदे यांनी माध्यमांना दिलेली माहिती न वाचता त्याचा विपर्यास केल्याचे म्हंटले आहे. तालुक्यात आरोग्य केंद्रांना लवकरच मंजुरी मिळेल असे म्हटले आहे. या राजकीय जुगलबंदीत खासदार व आमदारांचे कार्यकर्ते उतरले असल्याने वातावरण चांगलेच तापल्याचे पहावयास मिळत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com