नांदेड जिल्हा गुन्हेगारीमुक्त करणार, प्लॅन तयार- एसपी विजयकुमार मगर

प्रल्हाद कांबळे
Monday, 24 August 2020

मात्र नांदेडची भूमी ही श्री. गुरुगोविंद सिंग यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. पवित्र गोदावरी आणि संत, महात्म्यांची भूमी असल्याने मला एक वर्ष कसे गेले हे समजले नाही. खरच येथील नागरिक व लोकप्रतिनिधी आणि माध्यम हे अधिकाऱ्याला समजून घेऊन वेळप्रसंगी कठीण काळात त्यांच्या सोबत राहून काम करतात हे वाखान्यासारखे आहे.

नांदेड : कर्तव्य कठोर खात्यात काम करत असतांना अनेक कसोट्यावर उतरावे लागते. नविन जिल्‍ह्याचा पोलिस अधीक्षक पदाचा पदभार घेताना थोडी भिती असते. कारण येथील मातीतील माणसांचा, लोकप्रतिनिधींचा व पोलिस खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा स्वभाव ओळखणे अवघड असते. मात्र नांदेडची भूमी ही श्री. गुरुगोविंद सिंग यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. पवित्र गोदावरी आणि संत, महात्म्यांची भूमी असल्याने मला एक वर्ष कसे गेले हे समजले नाही. खरच येथील नागरिक व लोकप्रतिनिधी आणि माध्यम हे अधिकाऱ्याला समजून घेऊन वेळप्रसंगी कठीण काळात त्यांच्या सोबत राहून काम करतात हे वाखान्यासारखे आहे. येणाऱ्या काळात कुख्यात रिंदा व त्याच्या काही साथिदांरांच्या मुसक्या आवळ्ण्याचा प्लॅन केला असून गुन्हेगारांची गय केली जाणार नाही असे मत पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सोमवारी (ता. २४) सकाळी वर्षपूर्तीनिमित्त व्यक्त केले. 

जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी नांदेड पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर सोमवारी (ता. २४) ऑगस्ट रोजी त्यांना एक वर्ष पूर्ण झाले. अधीक्षक पदावर काम करत असताना प्रामुख्याने त्यांनी गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या. कुख्यात गुन्हेगार व त्यांच्या हस्तकांना प्रतिबंध करण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदाप्रमाणे मोका अंतर्गत वेगवेगळ्या दोन गुन्ह्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ३१ आरोपींपैकी २६ आरोपींना अटक केली. इतवारा पोलिस ठाणे अंतर्गत मोक्काच्या गुन्ह्यात एका पोलीस निरीक्षकाला अटक केली. 

हेही वाचा -  सार्वजनिक गणेश मंडळांना पोलिसांच्या सूचना, काय आहेत वाचा...?

गुन्हेगारी टोळीच्या एकूण ५३ जणांना अटक 

गुन्हेगारी टोळीच्या एकूण ५३ जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली. खंडणीसाठी जीवे मारण्याचा प्रयत्न, धमकीसह गोळीबार केल्याच्या घटना घडत होत्या. त्या घटना उघडकीस आणून अनेकांना कारागृहाची हवा खाण्यास भाग पाडले. अनेकजण अजूनही शासकिय पाहूणचार घेत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण करणे, खंडणी वसूल करणे, गोळीबार अशा घटनांचा बिमोड केल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान भारतीय हत्यार कायद्यान्वये ३८ प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. यात १४ देशी बनावटीचे पिस्टल, ३९ जिवंत काडतूस,  तलवार, खंजर यासह घातक शस्त्र जप्त केली आहे.

शेराचा पहिला एन्कॉउन्टर

पोलिसांनी चार नोव्हेंबर २०१९ रोजी अर्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या येहळेगाव शिवारात शेरा नावाच्या एका गुन्हेगाराचे एन्काऊंटर केले. त्याच्यावर भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होता. याशिवाय लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मुलाचे १५ लाखासाठी अपहरण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या तावडीतून त्या दोघांची सुटका केली. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी गुन्हेगार विकास हटकरवर गोळीबार केला या त्याच्या पायाला दुखापत झाली. ही घटना शहरापासून जवळच असलेल्या पुयनी शिवारात घडली होती.

येथे क्लिक करामहावितरण : नवीन बदली धोरणातील जाचक अटी रद्द करा- अधिकारी संघटना आक्रमक

सर्व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बळावर 

कायदा-सुव्यवस्था परिस्थिती व्यवस्थित रित्या हाताळणे, अवैद्य व्यवसायाद्वारे धडक मोहीम राबविणे तसेच महिलांवरील अत्याचारास आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे, गणेशोत्सव ईद-ए-मिलाद यासारख्या धार्मिक उत्सवात शिवाय २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा बंदोबस्त माझ्या सर्व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बळावर चांगल्या पद्धतीने करता आला.जगाला वेठीस धरलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देखील गस्त वाढविणे, नाकाबंदी करणे अशा उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांना तात्काळ पोलिसांची मदत मिळावी याकरिता मी शहरातील सहा पोलिस ठाण्यांतर्गत 3 मोबाईल पेट्रोलिंग वाहन, दोन दामिनी पथक तसेच २५ पोलीस चौक्या कार्यान्वित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करता आले.

अवैध धंदे चालकांनी आपला निर्णय बदलावा

येणाऱ्या काळात नांदेड शहर व जिल्हा हा गुन्हेगारमुक्त कण्यासाठी प्लॅन तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वांना सोबत घेऊन हे काम करायचे आहे. नांदेडकरांचे प्रेम माझ्या पाठीशी असेच राहील असा विश्‍वास त्यांनी व्‍यक्त केला. शहराची शांतता बाधीत करणाऱ्यांना सोडणार नसुन अवैध धंदे चालकांनी आपला निर्णय लवकरच बदलावा असा इशाराही त्यांनी दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded district will be crime free - SP Vijaykumar Magar nanded news