Nanded : कुलुप दिसले की चोरट्यांनी घर फोडलेच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

robbery

Nanded : कुलुप दिसले की चोरट्यांनी घर फोडलेच...

नांदेड : सध्या दिवाळीचा सण सुरू झाला असून सुटी असल्यामुळे काही जण घराला कुलुप लाऊन खरेदीसाठी तर काही गावी दिवाळी साजरी करण्यासाठी गेले आहेत. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून चोऱ्याचा सपाटा लावला आहे. भाग्यनगर पोलिस ठाण्यात हद्दीत दोन घरफोड्या झाल्या असून दोन लाख ६५ हजाराचा ऐवज लंपास केला आहे.

तरोडा बुद्रुक येथील श्याम लक्ष्मण नागलगावे (वय ४२, रा. राजसारथीनगर) हे त्यांच्या कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घराचे गेट आणि दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला.

घरातील लोखंडी कपाटातील सोन्या चांदीचे ९० हजाराचे दागिने आणइ रोख २५ हजार असा एकूण एक लाख १५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कांबळे करत आहेत.

दुसऱ्या घटनेत मंत्रीनगर येथील रो हाऊस ए - तीन मध्ये संगीता रंगनाथ वाकोडकर (वय ४९) या राहतात. त्या पतीसोबत भाजी आणण्यासाठी रविवारी (ता २३) सकाळी सहा वाजता गेल्या. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागून येऊन खिडकीमध्ये हात घालून पर्समधील रोख ५० हजार रुपये आणि एक लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असा एकूण दीड लाखाचा ऐवज चोरून नेला.

भाजीपाला घेऊन घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कांबळे करत आहेत.