नांदेड : शहरात घाणीचे साम्राज्य, महापालिकेचे दुर्लक्ष 

प्रल्हाद कांबळे
Thursday, 10 September 2020

शहराचा आत्मा असलेल्या वजिराबाद भागातच जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यावर डास, मच्छर व डुकरांचा सुळसुळाट झाला आहे.

नांदेड : एकीकडे सध्या कोरोनामुळे शहरवासीय त्रस्त असतांना दुसरीकडे अंतर्गत रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहराचा आत्मा असलेल्या वजिराबाद भागातच जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यावर डास, मच्छर व डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. या घाणीमुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने महापालिकेने त्याकडे लक्ष घालावे अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत. 

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थाही कामाला लागली आहे. मात्र शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. महापालिकेच्या वतीने कोरोनासह अन्य रुग्णांची आरोग्यसेवा सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. मात्र शहराचे मुख्य रस्ते वगळता अंतर्गत रस्त्यावर मागील काही दिवसांपासून साफसफाई होत नाही. त्यामुळे रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या घाणीवर डास, मच्छर तसेच बेवारस कुत्री व डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. 

हेही वाचा धक्कादायक : विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या -

महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक यांचे अक्षम्य दुर्लक्ष 

वाढत्या घाणीमुळे परिसरात दुर्गंधीपसरत आहे. याचा थेट परिणाम आबाल वृध्दांच्या आरोग्यवर होत आहे. सध्या संसर्गजन्य रोगाची साथ सुरु असल्याने त्यात ही नविनच भर पडत असल्याने रुग्ण संख्या वाढत आहे. महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याने साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एकमेकांना पायपोस नसल्याने शहरातील अंतर्गत रस्ते साफ केल्या जात नाहीत. महापालिका आयुक्त यांनी या बाबीकडे लक्ष घालावे अशी मागणी वजिराबाद भागातील नागिरक करत आहेत. 

येथे क्लिक करानांदेड : चिकाळा तांडा येथे गावठी दारूच्या हातभट्टयांवर पोलिसांची कारवाई -

वजिराबाद परिसरात घाणीचे साम्राज्य

शहराचा आत्मा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या वजिराबाद परिसरासह अन्य भागातही घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच काही भागात नाल्या तुंबल्याने नालीतील घाण पाणी रस्त्यावर येत आहे. शहरातील मुख्य रस्त्याबरोबरच अंतर्गत रस्त्यांची साफसफाई करावी अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे. महापालिकेचे या बाबीकडे दुर्लक्ष असल्याचे गौत्तम जैन यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Empire of filth in the city, neglect of the Municipal Corporation nanded news