नांदेड : डोळ्याला भुरळ घालणाऱ्या ‘गुलतुर वृक्षां’ च्या फुलांची उधळण 

रामराव मोहिते
Monday, 19 October 2020

हदगाव तालुक्यातील घोगरी या गावाला पूर्वीपासूनच निसर्गाचं सौंदर्य लाभलेलं आहे. गावच्या सभोवताली जवळपास 30 एकर गावठाण जमिनीवर सिताफळ वृक्षसंपदा असल्याने या गावाला सीताफळाचे गाव म्हणून संबोधले जात असे.

घोगरी (जिल्हा नांदेड) : प्रतिवर्षी नवरात्र उत्सवाची चाहूल लागताच, डोळ्याला भुरळ घालणारी ‘गुलतुर वृक्ष’ केसरी रंगाच्या फुलांची उधळण करीत अंगोपांगी बहरत असल्याने घोगरी ( ता. हदगाव) या छोट्याशा गावाने जणू केसरी शालू पांघरलेल्याचे चित्र आहे. यावरून या आदिशक्तीचा (स्त्री शक्तीचा) जागर घालण्यास निसर्ग ही मागे नसल्याचे पहावयास मिळत आहे.

हदगाव तालुक्यातील घोगरी या गावाला पूर्वीपासूनच निसर्गाचं सौंदर्य लाभलेलं आहे. गावच्या सभोवताली जवळपास 30 एकर गावठाण जमिनीवर सिताफळ वृक्षसंपदा असल्याने या गावाला सीताफळाचे गाव म्हणून संबोधले जात असे. शिवाय जवळच एक किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी ‘जागृत गणपती मंदिर’ असल्याने भाविकाची याठिकाणी चतुर्थीच्या दिवशी मोठी गर्दी दिसून येते. नजीकच्या काळात या गावठाण जमिनीवरील गढी (बुरुज) पांढरी माती इतरत्र नेण्याने सुरू होण्याने या गावचे अलौकिक सौंदर्य असलेले सिताफळ बागही वीरळ होण्याने याच मोकळया जागेवर मनमोहक अशा "गुलतुर वृक्षाची वाढ झालेली पहावयास मिळत आहे. 

हेही वाचा - आॅनलाईन शिक्षण : मुलांमध्ये वाढले कानाचे आजार

या ‘गुलतुर’ फुलाला बैलपोळा दिनी अनन्य महत्व 

संपूर्ण गावच्या सभोवताली याच हिरवाईचं कोंदन असल्याने शिवाय बैलपोळा सणाची चाहूल लागताच या वृक्षाला अल्प फुलाचा बहर आलेला असतो. या ‘गुलतुर’ फुलाला बैलपोळा दिनी अनन्य महत्व असल्याने, ही फुले नेण्यासाठी बळीराजाची मोठी गर्दी होताना दिसून येते. असं हे महत्त्वपूर्ण वृक्ष केवळ घोगरी गावाच्या सभोवताली असल्याने, या वृक्षाची संपूर्ण ग्रामस्थांच्यावतीने जपणूक केली जाते म्हणूनच ही वृक्षसंपदा आजही मोठ्या प्रमाणात टिकून असल्याचे दिसून येते. 

केसरी शालू पांघरून वनराई आदिशक्तीच्या स्वागतासाठी सज्ज 

हिंदू धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्र उत्सव, व शारदीय नवरात्र उत्सव, देवी म्हणजे शक्ती ती स्वयंभू असल्याने तिला आदिशक्ती म्हटले जाते. शारदीय नवरात्र उत्सवाची चाहूल लागताच जिकडे पाहावं तिकडे या वृक्षाला केसरी शालू पांघरून वनराई आदिशक्तीच्या स्वागतासाठी सज्ज असलेली दिसून येते. निसर्गाचं हे अलोकिक असलेलं लेनं व “डोळ्याला भुरळ घालणार सौंदर्य ” पाहून मनाला हर्ष वाटल्याशिवाय राहणार नाही अशी निसर्गाची ही महती आहे.

येथे क्लिक करापरतीच्या पावसानंतर विजेचे तांडव -

जागर घालण्यासाठी निसर्गही का बरे मागे रहावा असे बोलले तर वावगे नाही 

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने देवीने परिधान केलेल्या नऊ दिवसात नऊ रंगाच्या साडी पहिला परिधान करून देवीला मनोभाव पूजाअर्चा करण्याची प्रथा या नवरात्रोत्सवात पूर्वापार चालत आलेली असून ती आजही जपली जाते. याशिवाय पौराणिक कथेनुसार निसर्गदत्त केसरी रंगांमध्ये ऊर्जा असते. व प्रखरतेचे दर्शन या रंगातून होते. हा रंग धार्मिकतेचा मानला जातो म्हणून तर निसर्गही या आदी माया शक्तीला (स्त्रीशक्तीला ) जणू केशरी रंगाची उधळण करीत मनोभावे साद घालण्यासाठी उतावीळ झाला नसेल ना! असा भास निर्माण होतो आहे. हा उत्सव म्हणजे तपस्या सोबतच ( उपवास ) स्त्रीसुलभ सौंदर्याचा आहे.  आदी शक्ती (स्त्री शक्ती) चा जागर घालण्यासाठी निसर्गही का बरे मागे रहावा असे बोलले तर वावगे ठरणार नाही.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Eye-catching 'Gultur trees' flowers scattered nanded news